सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराची तोफ थंडावली असली तरीही उमेदवार तिळगूळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने

मतदारांच्या गाठीभेटी घेणार असल्याने खर्या ‘अर्था’ने मतदारांचे तिळगुळ गोड होणार हे मात्र नक्की.

मतदानाच्या आदल्यादिवशी 14 जानेवारी रोजी सात जन्माचं सौभाग्य लाभावं म्हणून पांडुरंगाला सुगडं वाहून साकडं घालण्याचा महिलांचा सर्वात मोठा सण मानला जातो. यावर्षी करोनामुळे निवडणूक प्रक्रिया लांबल्याने मतदान 15 जानेवारी रोजी होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच हा योगायोग जुळून आला आहे.

त्यामुळे गावागावांत उमेदवारांना आता तिळगुळाच्या निमित्ताने जणू मतदारांना भेटून आपली बाजू सरस करत तिळगूळ गोड करण्याची आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे आज मतदारांच्या दारी उमेदवार व गाव पुढारी यांच्या तिळगुळाला अर्थ प्राप्त होणार आहे.

कुठलीही निवडणूक असली की निवडणुकीच्या आदल्या दिवशीची रात्र कत्तलची रात्र म्हटली जाते. यावेळी मात्र मकरसंक्रांतीची रात्र ही मतदारांसाठी गोड तिळगुळाची रात्र ठरणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक वेळा विरोधकांच्या सुप्त दहशतीमुळे खुद्द उमेदवारांना मोकळ्या मनाने प्रचार करणे कठीण होते.

तर विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते हेरगिरी करत असतात. त्यामुळे अनेकवेळा राजकीय डावपेच कुरघोड्यांबद्दल माहिती नसल्याने नविन उमेदवारांची कुचंबना होताना दिसते. यावेळी मात्र मतदानाच्या अगोदर आलेला संक्रातीचा सण जणू काही उमेदवारांच्या पथ्थ्यावर असल्याचे दिसत असून एकप्रकारे उमेदवारांना पर्वणी लाभल्याचे दिसते. मात्र मतदारांचे तिळगूळ गोड होत असले तरी यंदाची मकरसंक्रांत कोणाला लाभ देणार? कोणाला शह देणार? हे येत्या सोमवारीच दिसून येईल.