सलाबतपूर परिसरात संततधार पावसाने खरिप हंगाम गेला वाया

ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट पंचनामे करण्याची मागणी
सलाबतपूर परिसरात संततधार पावसाने खरिप हंगाम गेला वाया

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील शिरसगाव, सलाबतपूर व परिसरात जवळपास दिड महिन्यापासून सततच्या सुरू असलेल्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बहुसंख्य शेतकर्‍यांच्या हातून खरीपाची पिके गेली असून परिसरातील सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावे तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे माजी सदस्य दत्तात्रय पोटे व पंचायत समिती माजी सदस्य प्रदीप ढोकणे यांनी दिला आहे.

जून व जुलै महिन्यात सलाबतपूर परिसर व गंगाथडीच्या पट्यात गळनिंब गोगलगाव, मंगळापूर, सुरेगाव, शिरसगाव, गोपाळपूर, खामगाव, वरखेड, माळेवाडी, बाभूळखेडे, दिघी आदी गावांमध्ये पावसाचा धुडगूस सुरु आहे. पिकांच्या लागवडी झाल्यापासून शेतकर्‍यांना सततच्या पावसामुळे पिकांची निगरानी करता आली नाही. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतामध्ये पाणी साचले असून पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातून खरीप पिके गेली आहेत.

इंधन दरवाढीमुळे नांगरणीचे तसेच पेरणीचे भाव आकाशाला भिडले आहेत. खते, बी-बियाणे, औषधी याचेही भाव मोठ्याप्रमाणात वाढले आहे. सुरुवातीलाच पावसाने साथ दिल्याने शेतकर्‍यांनी उत्पादन वाढीच्या आशेपोटी बाजरी, कपाशी, मका, तुर, सोयाबीन या पिकांवर मोठ्याप्रमाणात खर्च केला. मात्र नंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकर्‍यांची सर्व मेहनत वाया गेली असून वाढत्या महागईच्या काळात आस्मानी संकटाने पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शेती मशागतीसाठी केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने आता उदार होऊन शेतकर्‍यांच्या मदतीला धावून यावे अशी आर्त हाक शेतकरी देत आहे.

परिसरातील खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करण्यांत यावे व शेतकर्‍यांना त्वरित नुकसान मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. जर लवकर दखल घेतली गेली नाही तर परिसरातील शेतकर्‍यांसह कुठलीही सुचना न देता अंदोलन सुरु करू असे दत्तात्रय पोटे व प्रदिप ढोकणे यांनी सांगितले.

पंचनाम्याबाबत ‘महसूल’ची दखल नाही

मागील आठवड्यात माजी मंत्री राधाकृष्ण विखे हे नेवासा तालुका दौर्‍यावर असताना विठ्ठलराव लंघे, दत्तात्रय पोटे, प्रदीप ढोकणे व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन शेतकर्‍यांची व्यथा मांडली होती. आ. विखे यांनीही तत्परता दाखवत महसूल विभागाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. मात्र महसूल खात्याने त्याची कुठलीच दखल घेतली नसल्याचे माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप ढोकणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com