सलाबतपूर येथे तीन रोहित्रे जळाल्याने अर्धे गाव अंधारात

रोहित्र जळण्याची कारणे शोधण्याकडे अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे संताप
सलाबतपूर येथे तीन रोहित्रे जळाल्याने अर्धे गाव अंधारात

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे दोन आठवड्यांत तीन रोहित्रे नादुरुस्त झाल्याने अर्धे गाव अंधारात असून रोहित्रे नादुरुस्त का झाली? अतिरिक्त भार कसा येतो? हे पाहण्यास वीज वितरणचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सलाबतपूर गावठाणमधील नागरिकांना रोहित्र विजेच्या अतिरिक्त भाराने खराब होत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात अंधाराचा सामना करावा लागत आहे . गणपती बसल्यानंतर तब्बल आठ दिवस अर्धा गाव अंधारात होता. तर गेल्या पंधरा दिवसांत तीन रोहित्रे जळाली आहेत. या रोहित्रावरील वीज कनेक्शनपेक्षा आकडे टाकून वीज वापरणारांची संख्या जास्त आहे. तसेच वीज चोरांकडून सर्रासपणे शेगडी-हिटरचा वापर होत असल्याने विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याचे बोलले जात आहे.

सततच्या वीज चोरीमुळे पूर्ण दाबाने कधीच वीज पुरवठा होत नाही. मात्र वीजवितरण अधिकारी वीज चोरांवर कधीच कारवाई करताना दिसत नाहीत. उलट अधिकृत वीज धारकांकडून पठाणी स्टाईलने वसुली केली जाते. वीजबील न भरणारांचे वीज कनेक्शन कट केले जाते. त्यामुळे वीज वितरणकडून चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था झाली आहे. तीन रोहित्र जळूनही अधिकार्‍यांना या रोहित्राला जोडलेल्या विजेची चोरी नक्की कोठे होते हे पाहणेही जमले नाही.

पहिला रोहित्र खराब झाला त्यावेळी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे दुसर्‍या दिवशी गावठाणसाठी नविन रोहित्र उपलब्ध झाला. मात्र तो बसवण्यापूर्वी तरी रोहित्र का खराब होतो हे पाहणे गरजेचे होते मात्र तसे न करता रोहित्र बसवले आणि शेवटी व्हायचे तेच झाले. दोन दिवसांत पुन्हा रोहित्र बदलण्याची वेळ आली. तोही तीनच दिवसांत जळून गेला. आता गावाची मुख्य पेठच अंधारात आहे. आता तीन रोहित्रानंतर गावठाण भाग नक्की कधी प्रकाशमान होईल हे सांगणे कठिणच आहे .

गावठाणातच वीज नसल्याने याचा व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे विजेवर चालणार्‍या व्यावसायिकांवर हातावर हात देऊन बसण्याची वेळ आली आहे. यामुळे व्यावसायिकांची आर्थिक चणचण वाढली आहे. वीजवितरण अधिकार्‍यांनी नविन रोहित्र बसवण्याआगोदर वीज चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अधिकृत जोडणीधारक वीज ग्राहकांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.