सलाबतपूर परिसरात कापूस चोरीसह भुरट्या चोर्‍यांनी लोक हैराण

सलाबतपूर परिसरात कापूस चोरीसह भुरट्या चोर्‍यांनी लोक हैराण
कापूस

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात कापूस चोरीबरोबर भुरट्या चोर्‍या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. सध्या तालुक्यातील सलाबतपूर परिसरात शेतकर्‍यांच्या पांढरं सोनं असलेल्या कापसाला कधीनव्हे तो आठ हजाराच्या आसपास भाव मिळत आहे. मात्र शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावण्याचे काम सध्या परिसरातील भुरटे चोर करत असल्याची चर्चा सुरू आहे.

यंदा कापसाची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे. मात्र चोरांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकरी याबाबत तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे चोराचे फावले जात असून आता कापसाबरोबरच चोरटे गावातही चोर्‍या करू लागले असल्याने नागरिकांबरोबर व्यापारी धास्तावले आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी गावातील किराणा दुकान फोडून सामानाची चोरी केली होती. त्याचबरोबर शेळ्यांच्या चोर्‍या झाल्या.

काल परवा भुरट्या चोरट्यांनी कहरच केला. सलाबतपूर गावात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांच्या कोप्यातून मध्यरात्री रोख रक्कम, सोनं, मोबाईल तसेच मुलाबाळांना खाण्यासाठी आणलेल्या वस्तुंसह किराणा मालाची नासधुस केली आहे. हे सर्व पाहणारांमधून हळहळ व्यक्त होत आहे. तर भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. भुरट्या चोर्‍याच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रमाणामुळे शेतकरी व्यापार्‍यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आसून पोलिसांनी भुरट्या चोरांना धडा शिकवावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

सलाबतपूर परिसरात चोरांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे धारिष्ट्य वाढत असून पोलिसांनीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीची गस्त सुरू करावी.

- बबनराव तांबे ग्रामपंचायत सदस्य

सलाबतपूर गावात सध्या अवैध व्यवसाय मोठ्याप्रमाणात फोपावत असून त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी गावात पोलीस चौकीची गरज असून तसा ग्रामपंचायत ठराव करून पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी करणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com