
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता शहर आणि साकुरी या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या कात नाल्यात ग्रामपंचायत दररोज कचरा जाळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची तक्रार साकुरी येथील व्यावसायिक मुकूंद दंडवते यांनी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्याकडे केली आहे. तेथील कचरा जाळणे बंद करावे, अशी त्यांची मागणी आहे.
साकुरी ग्रामपंचायत आपला दररोजचा कचरा कात नाल्यात आणून तेथे जाळून टाकत असल्याची श्री. दंडवते यांची तक्रार आहे. हा कचरा दररोज जाळून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते व हवेचे प्रदुषण होते. या प्रदुषणामुळे आजुबाजुच्या व्यावसायिक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतची तक्रार आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती मुकूंद दंडवते यांनी दिली.
साकुरी ग्रामपंचायतीने कचरा जाळु नये व होणारे प्रदुषण थांबवावे. यामुळे कातनाल्यावरील पुलावरुन जाणार्या नगर मनमाड हायवे वरील वाहनांनाही या प्रदुषणाचा त्रास होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या कचर्याला न जाळता विल्हेवाट लावावी. नागरिकांना होणार्या त्रासापासून मुक्तता करावी, अशी त्यांची मागणी आहे.