साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास उपमुख्यमंत्र्यांकडून मान्यता

डिसेंबरअखेर आराखडा सादर करण्याच्या सूचना
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुंबई येथे झालेल्या बैठकीत साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व्हेक्षण निविदा अंतिम होणार असून डिसेंबरअखेर सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येऊन आराखडा सादर करण्याचा सूचना मंगळवारी झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत.

साकळाई पाणी योजना ही श्रीगोंदा, नगर तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी आहे. गेले 35 वर्षांपासून मागणी होत आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी वाळकी येथील सभेत साकळाई पाणी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील सत्तांतरानंतर याबाबत खा.डॉ.सुजय विखे पाटील उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते. काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री फडणवीस, खा. डॉ. विखे, खा. सदाशिव लोखंडे, आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जलसंपदा सचिव, सचिव लाभ क्षेत्र विकास, मुख्य अभियंता कुकडी आणि इतर अधिकार्‍यांची बैठक झाली.

या बैठकीत साकळाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मान्यता देण्यात आली. 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व्हेक्षण निविदा अंतिम होणार असून डिसेंबरअखेर सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येऊन आराखडा सादर करण्याचा सूचना या बैठकीत जलसंपदा खात्याला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2022 नंतर चौथ्या सुधारित प्रशासकीय आराखड्यात साकळाई योजनेचा समावेश करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पुढील अर्थसंकल्पात त्यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे. याबरोबरच डिंभे धरण ते माणिकडोह अंतर्गत बोगद्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच कुकडी डावा कालव्याच्या प्रस्तावित मूळ क्षमतेने वाहता करण्यासाठी विशेष दुरुस्ती निधीसही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होत, येडगाव धरणातील पाणीसाठा वाढून त्याचा फायदा मोठ्या क्षेत्राला मिळणार आहे. साकळाई पाणी योजना मार्गी लागणार असल्याने नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.

पिंपळगाव माळवीतील एमआयडीसीचे आरक्षण उठवणार

साकळाईच्या बैठकीनंतर मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पिंपळगाव माळवी या गावातील एमआयडीसीचे आरक्षण उठवण्याचा निर्णय झाला. तसेच नवनागापूर गावातील एमआयडीसीच्या लगत असलेल्या जमिनीवर पेव्हिंग ब्लॉक सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आला. एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांचे विकास धोरण देखील ठरविण्यात आले. यासोबतच भविष्यात नगर शहरात व जिल्ह्यात उद्योगाचे विविध मार्ग उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. खा. डॉ. सुजय विखे पाटील, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अनबलगन, माजी आ. शिवाजीराव कर्डिले आणि एमआयडीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com