
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
साकाळाईसाठी सर्वेक्षणाचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत, पण त्यासाठी जलसंपदा खात्याने आवश्यक असणारे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र दिलेले नाहीत. त्यामुळे सर्वेक्षणास मंजुरी मिळूनही सर्वेक्षण सुरू झालेले नाही. यामुळे जलसंपदा खात्याने पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने द्यावे, सर्वेक्षण लवकर व्हावे यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने 1 मार्च रोजी खडकी तालुका नगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन साकळाई कृती सामितीचे पदाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले.
श्रीगोंदा व नगर तालुक्यातील जिराईत भागातील 32 गावांसाठी साकळाई उपसा जलसिंचन योजना वरदान ठरणारी आहे. 28 वर्षांपासून या योजनेची मागणी होत आहे. त्यासाठी मुंबईपर्यंत पायी मोर्चा, रास्ता रोको आंदोलने झाली आहेत. पण यावर पुढे काही कार्यवाही झालेली नाही. आजमितीला कुकडी प्रकल्पात पाच टीएमसी पाणी शिल्लक असल्याचा जलसंपदा खात्याचा अहवाल आहे. त्यातून साकळाईसाठी तीन टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी आहे नुकतेच भाजप शिंदे सरकारने या योजनेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
पण त्यासाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मात्र जलसंपदा खात्याने पाच महिन्यानंतरही दिलेले नाहीत. जलसंपादन खाते जाणीवपूर्वक उशीर करत आहे. त्यामुळे कृती समितीने रस्त्यावर लढाई करण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात गुरूवारी हॉटेल यश पॅलेस येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र खाकाळ, ज्ञानदेव भोसले, बाबा महाराज झेंडे, सरपंच सुरेश काटे, नारायण रोडे, सरपंच राजेंद्र झेंडे, सोमा धाडगे, उद्योजक ज्ञानदेव भोसले, राजाराम झेंडे, शिवाजी इधाटे, संपत साबळे, रोहीदास उदमल, मंजाबापू झेंडे, बाबासाहेब गव्हाणे, विलास लाकुडझोडे, गुलाबराव रामफळे, पंडित टकले उपस्थित होते.