राळेगणसिद्धी, साकळाई योजनांच्या सर्वेक्षणाचे आदेश
सार्वमत

राळेगणसिद्धी, साकळाई योजनांच्या सर्वेक्षणाचे आदेश

जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार निलेश लंके यांची पुण्यात बैठक

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

राळेगणसिद्धी तसेच साकळाई योजनांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला असून दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सोमवारी (दि. 27) पुणे येथे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत देण्यात आले.

जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांसदर्भात मंत्री जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांची पुणे येथे बैठक अयोजित केली होती. या बैठकीत पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धीसह नऊ गावे तसेच नगर तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आग्रही मागणी आमदार लंके यांनी केली.

त्यावर या योजनांसाठी लागणार्‍या पाण्याची उपलब्धताही कोकणामध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे वळविल्यानंतर उपलब्ध होणार्‍या पाण्यापासून होणार असल्याचे अधिकार्‍यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. मंत्री पाटील यांनी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी या दोन्ही योजनांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.

या सर्वेक्षणानंतर उपलब्ध होणार्‍या पाण्यातून साकळाई उपसा योजना तसेच राळेगणसिद्धीसह नऊ गावांच्या योजनांना प्राधान्याने देण्याबाबत पाटील यांनी सहमती दर्शविली. याच बैठकीत आमदार लंके यांनी पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या 58 ते 70 किलोमीटरपर्यंत अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्यावर अस्तरीकरणाचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी दिल्या.

पिंपळगाव जोगा कालव्यावरील पारनेर तालुक्यातील वितरिकांची उर्वरीत कामे तातडीने हाती घेण्याच्या आ. लंके यांच्या मागणीवर तसा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या शेवटी असलेल्या वडझिरे तलावापासून शिवडोह तलावापर्यंतच्या बंदिस्त नलिका लाईनचे काम पूर्ण करून पिंपळगाव जोगा धरणातील पाणी शिवडोह तलावापर्यंत पोहोचविण्याचे काम तातडीने हाती घेण्यासंदर्भात या बैठकीत पाटील यांनी सूचना दिल्या. कुकडी डावा कालव्यावरील कि. मी. 31 एस्केप बांधून जांबूतसह इतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश या बैठकीत दिले.

दरम्यान या बैठकीसंदर्भात बोलताना आमदार लंके यांनी सांगितले की, आपण विधानसभेचे सदस्य झाल्यापासून या दोन्ही योजनांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होतो. दोन्ही योजनांमुळे शेतकरी वर्गाचा मोठा लाभ होणार असल्याची बाब आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

पवार यांनीही या दोन्ही योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत, यावर सहमती दर्शविली होती. पवार यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण दोन्ही योजनांसाठी पाठपुरवा केला व मंत्री जयंत पाटील यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही योजनांचे सर्वेक्षण, शिवडोह बंदिस्त नलिकेचे काम, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेणे, कालव्यांचे अस्तरीकरण याबाबत अधिकार्‍यांना थेट आदेश दिल्याचे ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com