‘साकळाई’चे सर्वपक्षीय नेत्यांकडून राजकारण

कृती समितीचा आरोप: हिवरेझरे येथे रास्ता रोको आंदोलन
‘साकळाई’चे सर्वपक्षीय नेत्यांकडून राजकारण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या मागणीसाठी सोमवारी हिवरेझरे (ता. नगर) याठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण केले. निवडणूक आली की साकळाई प्रश्नांबाबत बोलतात, आश्वासन देतात आणि निवडणूक संपताच पाठ फिरवतात. आजवर सर्वच राजकीय नेत्यांनी साकळाईचे भांडवल म्हणून वापर केला, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब हराळ म्हणाले, नगर तालुक्यातील स्वतः चा आमदार, खासदार नाही. त्यामुळे नगर तालुक्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे. तीन टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. साकळाई पाणी योजनेची मागणी 25 वर्षांपासूनची आहे. जर पाणी मिळाले नाही तर नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असे ते म्हणाले. बाबा महाराज झेंडे म्हणाले, आम्ही आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांना वेळोवेळी भेटलो. त्यांनी सांगितले आंदोलन थांबवा, आम्ही पाणी मिळवून देतो.

पण आता साकळाईला डावलून पाणी पारनेर आणि कर्जत जामखेडला नेण्याचा डाव सुरू आहे. असे झाले तर मंत्री, अधिकारी, यांना घेराव घालू, असा इशारा झेंडे महाराज यांनी दिला. पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस म्हणाले, सरकार कोणाचेही असो प्रश्न शेतकर्‍यांच्या पाण्याचा आहे. सर्व पक्षीय पुढारी जर आंदोलनात एकत्र येतात तर त्याच भावनेने सगळ्यांनी मिळून साकळाईसाठी एकत्रित लढा देण्याची गरज आहे. पाणी आपल्या उशाला आहे, पण आपल्याला मिळत नाही. कोणत्याही नेत्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे ते म्हणाले.

यावेळी राजाराम भापकर, संदेश कार्ले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, ज्ञानदेव भोसले, सुरेश काटे, राजेंद्र झेंडे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र म्हस्के, संजय गिरवले, झुंबरराव बोरूडे, संजय धामणे, दादा दरेकर, ज्ञानदेव कवडे, ऍड. अनुजा काटे, रामदास झेंडे, अण्णा चोभे, सुनील खेंगट, अंजिनाथ झेंडे, हभप अन्नड महाराज, संतोष लगड, रोहिदास उदमले, प्रताप नलगे, सोमनाथ धाडगे, डॉ. खाकाळ आदी उपस्थित होते.नगर तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com