
राहुरी । तालुका प्रतिनिधी
उंबरे येथील घटनेच्या निषेधार्थ व लव्ह जिहाद विरोधात देशभरात कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने काल राहुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल होते. ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. 50 हजाराहून अधिक हिंदू समाज बांधवांच्या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
तालुक्यातील ग्रामिण भागातून हिंदू समाज भगव्या टोप्या व हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत घोळक्याने येऊन मोर्चात सहभागी झाले. यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र त्याची तमा न बाळगता हिंदू बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा शुक्लेश्वर चौकातून छत्रपती शिवाजी चौक ते शनिमंदिर चौक मार्गे जुन्या ग्रामिण रुग्णालयासमोर आला. मोर्चाचे राहुरीतील वायएमसीए मैदानावर विराट सभेत रूपांतर झाले.
यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदूत्ववादी सरकार आहे. पोलीस प्रशासनाने हिंदूंबाबत दुटप्पीपणाची भुमिका घेतली तर मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालणार आहे. मस्तवाल आधिकार्यांनी अशा घटनांत योग्य ती कारवाई वेळात पूर्ण करावी.
देशाच्या इतिहासात हिंदूंनी कधीच दंगल घडविली नाही. हिंदू समाज कधीच कुणाच्या अंगावर जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सविधानाचे कायद्यांचे पालन करतो. अन्य धर्माच्या लोकांना कधीच त्रास होत नाही. प्रत्येकाने आपला धर्म संभाळावा व आम्हाला हिंदू म्हणून आमच्या देशात सुखाने जगू द्यावे. आम्ही तुमच्या धर्माच्या आडवे येत नाही, तुम्ही आमच्या धर्माच्या आडवे आला तर गय केली जाणार नाही.
उंबरे घटनेत गुन्हा करण्यार्या एकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर पोलिसांनी आमचे 13 जण ताब्यात घेतले. आणि संपूर्ण गावाने फिर्याद देऊनही त्यांचे काहीजण ताब्यात घेतल्याचे सांगून त्यांनी राहुरी पोलिसांच्या कारवाईवर ताशोरे ओढले. हिंदू धर्माचे कोणतेही सण आले तर पोलीस प्रदूषणाचा कायदा पुढे करीत आडकाठी घालतात. मात्र, दिवसातून चार ते पाच वेळा भोंगे वाजतात. त्याचे प्रदूषण यांना दिसत नाही. धर्माच्या नावाखाली आमच्या हिंदूच्या माता-भगिणींकडे वाकड्या नजरेने पाहीले जाते. आ. प्रसाद लाड यांनी विधीमंडळात या घटनेबाबत कारवाईची मागणी केली. मात्र राहुरी पोलिसांनी पिडीताला वाचविण्यासाठी जाणार्यांवरच कारवाई केली. मी विधानसभेत लक्षवेधी मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सांगितले की, पोलीस खात्यातील मस्ती आलेेले काही आधिकारी तुमचे नाव खराब करण्याचे काम करतात. हिंदूच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांना सात ते आठ तास बसून ठेऊन धमक्या देतात. हे हिंदूत्ववाद्यांचे सरकार आहे. पोलीस खात्याने कोणाच्याही बिर्याणीला बळी पडू नये, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावरील श्रीसंत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे महाराज, हर्षदा ठाकूर, एकलव्य संघटनेचे योगेश सुर्यवंशी, श्रीराम सेनेचे सागर बेग यांनी भाषणातून घटनेचा समाचार घेतला. राहुरी तालुक्यातील सर्वच हिंदू संघटनांचे व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राहुरी शहरातील काही धार्मिक स्थळांच्या आसपास पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच या मोर्चासाठी राहुरी पोलिसांबरोबर शिघ्र कृतीदलाची विशेष पथकेही तैनात करण्यात आली होती. मोर्चा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेऊन होते.
मोर्चात खा. डॉ.सुजय विखे पाटील, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, हर्ष तनपुरे, अक्षय कर्डिले, डॉ. तनपुरेचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, रावसाहेब चाचा तनपुरे, छत्रपती संभाजी प्रतिष्ठानचे राजुभाऊ शेटे, प्रकाश पारख, रूद्राक्ष मंचाचे नितीन तनपुरे व त्यांचे सहकारी, देवळाली प्रवरेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आण्णासाहेब म्हसे, तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका प्रमुख सचिन म्हसे, राहुरी तालुका वारकरी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, विद्यार्थी सेनेचे रोहन भुजाडी, माजी नगरसेवक शिवाजीराव सोनवणे, नंदकुमार तनपुरे, सुर्यकांत भुजाडी, भारत भुजाडी, भारत तारडे, संतोष आघाव, अमोल भनगडे, नंदू पेरणे, विलास गागरे, सुरसिंग पवार, डॉ. प्रकाश पवार, विराज धसाळ, रविंद्र म्हसे, गंगाधर सांगळे, मियासाहेब पतसंस्थेचे शामराव निमसे, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, ज्ञानदेव निमसे आदींसह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रास्तविक आदिनाथ महाराज दुशिंग यांनी तर सूत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केले. यावेळी ब्राम्हणी येथील धर्मांतर विरोधी भुमिका घेतलेल्या मिराबाई हरेल यांचा आ. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
काल मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राहुरी शहरातील सर्वच लहान-मोठ्या व्यवसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे मोर्चासाठी आलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून आ. प्राजक्तदादा मित्र मंडळाच्या वतीने आलेल्या मोर्चेकरांना मोर्चास्थळी चहापाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कडकडीत बंद
सकल हिंदू समाजाच्या मोर्चानिमित्त राहुरी शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवेसह 100 टक्के कडकडीत बंद पाळला गेला. व्यापारी बंधू सर्व व्यवहार बंद ठेऊन आपल्या मुलांबाळांसह मोर्चात सहभागी झाले होते. शहरात सर्वत्र भगवे झेंडे हातात घेऊन, डोक्यावर भगवी टोपी धारण केलेले मोर्चेकरी दिसत होते. त्यामुळे राहुरी शहर भगवेमय झाले होते.