आ. पाचपुतेंचा पुतण्या साजन यांच्या हाती शिवबंधन

थेट शिवसेनेच्या उपनेतेपदी लागली वर्णी
आ. पाचपुतेंचा पुतण्या साजन यांच्या हाती शिवबंधन

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्याचे भाजपचे आ. बबनराव पाचपुते यांचे पुतणे, काष्टी गावचे लोकनियुक्त सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साजन सदाशिव पाचपुते यांनी सोमवार (दि.4) मुंबई येथे शिवसेनेत (उध्दव ठाकरे गटात) प्रवेश केला. प्रवेशानांतर लगेच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी लागली आहे.

पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या हस्ते पाचपुते यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी त्याच्या कुटूंबासंह तालुक्यातील युवक कार्यकर्ते मोठया संख्येने मुंबईत उपस्थित होते. साजन पाचपुते यांनी समर्थकासह मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. मागील काही वर्षांपासून आमदार पाचपुते कुटुंबात गृह कलह सुरू आहे. मागील वर्षी काष्टी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. पाचपुते आणि त्याचे पुतणे साजन पाचपुते यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यावेळी आ. पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांचा पराभव करत साजन पाचपुते काष्टीच्या सरपंच पदावर विराजमान झाले.

त्यानंतर बाजार समिती निवडणुकीत विरोधी गटातून संचालक झाले आहेत. साजन पाचपुते हे मागील काही दिवसांपासून कोणत्या पक्षात जायचे याबाबत चाचपणी करत होते. मागील आठवड्यात त्यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, खा. राऊत याची भेट घेतली होती. आता त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला असल्याने तालुक्यातील ठाकरे गटाला भक्कम आधार मिळणार आहे. पाचपुते यांना उपनेतेपद ठकारे गटाकडून उपनेते बहाल केल्याने आता दक्षिणेत शिवसेनेला युवा चेहरा मिळाला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com