साईबाबा संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लांट सुरू करावा : पालकमंत्री

साईबाबा संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लांट सुरू करावा :  पालकमंत्री

शिर्डी (प्रतिनिधी) -

कोव्हिडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोव्हिडबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज पडते. येणार्‍या काळात कोव्हिडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याने कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन वायूच्या पुरेशा उपलब्धतेसाठी साई संस्थानने साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हवेतून ऑक्सिजन मिळण्यासाठी आवश्यक प्लँट तातडीने उभारण्याचे निर्देश पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिले.

राहाता तालुक्यातील करोना सद्यस्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, शिर्डी परिसरातील कोव्हिड केअर सेंटरची पाहणी तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा. सदाशिव लोखंडे, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ओमप्रकाश पोखर्णा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. मैथिली पितांबरे, सचिन चौगुले, रमेश गोंदकर यावेळी उपस्थित होते.

साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे जवळपास 550 बेड्स असून त्यापैकी 150 बेड्स नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवावे आणि उर्वरित चारशे बेड्स कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सूचना यावेळी पाकलमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकार्‍यांना केली. कोव्हिड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या बेड्ससह ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याचे तसेच यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने कारवाई सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

खा. सदाशिव लोखंडे यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या कार्यात थोड्या अडचणी असून त्यात मार्ग काढता येईल, असे सांगितले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भविष्यातील कोव्हिडबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने सर्व व्यवस्था करावी. तसेच यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची सूचना केली. आ. आशुतोष काळे यांनीही कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने तातडीने सर्व उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी आवश्यक विविध प्रशासकीय मान्यता प्राधान्याने देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रास्ताविकात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोव्हिड रुग्णांची काळजी घेण्यात येत असून त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले.

साईआश्रम धर्मशाळेतील कोव्हिड केअर सेंटरला पालकमंत्र्यांची भेट

श्री साईबाबा संस्थान संचलित साईआश्रम फेज दोन येथील धर्मशाळेतील कोव्हिड केअर सेंटरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या सेवा, औषधे, नाष्टा व जेवण, परिसराची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत पालकमंत्र्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कोव्हिड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com