साईबाबांचा गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने होणार

अरुण डोंगरे : उत्सवाच्या मुख्य दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन
साईबाबा गुरुपौर्णिमा उत्सव
साईबाबा गुरुपौर्णिमा उत्सव

शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थानच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवार दि. 4 ते सोमवार 6 जुलै या काळात श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत असून करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईआश्रम येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

श्री. डोंगरे म्हणाले, 4 जुलै ते दि. 6 जुलै 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणारा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी शनिवार दिनांक 4 जुलै रोजी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, 5 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 5.15 वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, 5.30 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6.00 वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. 7 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायणासाठी द्वारकामाई रात्रभर उघडे राहील.

उत्सवाच्या मुख्य दिवशी 5 जुलै रोजी सकाळी 4.30 वाजता श्रींची काकड आरती, 5 वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 5.25 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.

सांगता दिनी 6 जुलै रोजी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी 5.45 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी 10 वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताची उणीव भासत आहे. याकरिता श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने उत्सवाच्या मुख्य दिवशी 5 जुलै रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत श्री साईआश्रम (1 हजार रुम) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्या रक्तदात्यांना प्लाझ्मा या रक्त घटकाचे दान करावयाचे आहे, अशा दात्यांनी आपली नावे श्री साईनाथ रक्तपेढी, शिर्डी येथे नोंदवावी. तरी रक्तदान करणार्‍या इच्छुक रक्तदात्यांनी व संस्थान कर्मचार्‍यांनी या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com