इतिहासात प्रथमच साई संस्थानच्या तिजोरीच्या चाव्या महिलेकडे

इतिहासात प्रथमच साई संस्थानच्या तिजोरीच्या चाव्या महिलेकडे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथील आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणार्‍या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य लेखाधिकारी म्हणून मंगला भास्कर वराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रथमच श्री साईबाबा संस्थानच्या तिजोरीच्या चाव्या एका महिलेकडे आल्या आहेत. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील नऊ अधिकार्‍यांच्या विनंती बदल्यांचा नुकताच महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव ता.र. पवार यांच्या सहीने नुकताच हा आदेश काढण्यात आला असून या आदेशानुसार नाशिक विभागीय आयुक्तालय येथील सहाय्यक संचालिका लेखा विभागातील श्रीमती मंगला भास्कर वराडे यांची शिर्डी येथे मुख्य लेखाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी येथे प्रभारी मुख्य लेखाधिकारी म्हणून कैलास खराडे हे प्रभारी अधिकारी म्हणून या विभागाचे काम पाहत होते.मात्र देशातील क्रमांक दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून साईबाबा संस्थान कडे पाहिले जाते देशातील अब्जाधीश उद्योगपती, सिनेतारका,दिग्गज नेते साई चरणी नतमस्तक होत मोठमोठ्या देणग्या साईबाबांच्या झोळीत दान स्वरूपात टाकत असतात... महिण्यकाठी कोट्यावधींच्या रक्कमेची उलाढाल दानपेटी आणि विविध विभागामार्फत होत असते आणि हा सर्व हिशोब या लेखा शाखेकडे असल्याने हा विभाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि लेखा अधिकारी हे शासकीय अधिकारी असतात मात्र जवळपास गेल्या वर्षभरापासून शासनाचा अधिकारी नियुक्त नसल्याने प्रभारी अधिकार्‍याकडे हा विभाग सोपविला होता अत्यंत महत्त्वाचा हा विभाग असल्याने सक्षम अधिकारी या ठिकाणी नियुक्त होणे गरजेचे होते. त्यामुळे आता साई संस्थांनमध्ये शासकीय महिला अधिकार्‍यांची प्रथमच मुख्य लेखाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे संस्थांनच्या सर्व लेखा, वित्त विभागाच्या चाव्या एका महिला अधिकार्‍याकडे आल्या आहेत. व हळूहळू मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या कार्यकाळात प्रभारी राजही कमी कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com