साईबाबा संस्थान रुग्णालयातील औषध घोटाळ्याची चौकशी करा

शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्याकडे मागणी
साईबाबा संस्थान रुग्णालयातील औषध घोटाळ्याची चौकशी करा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या रूग्णालयातील औषध घोटाळा सखोल चौकशी करण्याबरोबरच हॉस्पिटलमधील प्रभारीराज संपवण्यासाठी

संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी कठोर निर्णय घेवून रुग्णालयातील बेबंदशाही व चमकोगीरीला लगाम घालावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिर्डी शहरातील पदाधिकार्‍यांनी केली आहे.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबांनी आपल्या संपूर्ण हयातीत दुःखी व गोरगरीब पिडीतांची सेवा केली. रुग्णसेवेचे हेच व्रत पुढे श्री साईबाबा व साईनाथ रूग्णालयाच्या माध्यमातून सुरू आहे.

मात्र तदर्थ समितीच्या बैठकांना मोठा विलंब होत असल्याने अलिकडच्या काळात संस्थान रूग्णालये आणि संस्थान प्रशासनाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने दर महिन्याला संस्थान तदर्थ समितीची बैठक घेतली जावी, स्थानिक राजकीय नेत्यांच्या पुढे-मागे धावणार्‍या हॉस्पिटलमधील प्रभारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच औषध खरेदीला मान्यता असतानाही ती कमी प्रमाणात खरेदी का करण्यात आली.

या प्रकरणी संबंधितांचे आणि खासगी औषध विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबध आहे का? औषध खरेदीसाठीच्या टेंडर प्रक्रियेसाठी दिड वर्षे लागतात का? संस्थान रूग्णालयातील कोणत्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबातील औषधी विक्री व्यवसाय आहे का? या औषध खरेदी प्रकरणाशी त्यांचा संबंध क़ाय आहे याची सखोल चौकशी व्हावी.

दरवर्षी 50 कोटी रुपये औषधांच्या खरेदीसाठी तरतूद असताना की गेल्या अवधी वीस कोटीची खरेदी का करण्यात आली? जाणीवपुर्वक औषधे खरेदी न करता रुग्णांना बाहेरून औषधे घेण्यासाठी भाग पाडले जाते का? या औषध घोटाळ्याची चौकशी करून या घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणीही बगाटे यांच्याकडे करण्यात आली.

साईबाबा व साईनाथ रुग्णालयातील आरोग्यसेवा अद्ययावत संगणक प्रणालीद्वारे जोडली जावी. त्यामुळे रूग्णांच्या पुर्वीच्या आजारांची माहीती व सध्याची डॉक्टरांनी सुचवलेली औषधे याचा डाटा संस्थानकडे उपलब्ध होवू शकेल. साईबाबा संस्थानने खरेदी केलेली सर्व औषधे याचा लेखाजोखा ठेवण्यासही मदत होऊ शकते.

रुग्णालयांचा कारभार मोठा कारभार असतांना तो संगणकीकृत करण्याचा निर्णयही लवकर घ्यावा. संस्थानच्या साईबाबा आणि साईनाथ या दोन्ही रुग्णालयातील मेडीकल डायरेक्टर, सुपरीडेंट अ‍ॅडमिनिट्रीव्ह, पीआरओ आदी पदे त्वरीत भरण्यात येवून हॉस्पिटलमधील प्रभारी राज संपवावे, असे आवाहनही करण्यात आले.

यावेळी रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, निलेश कोते, अमित शेळके, राहुल कुलकर्णी, दिपक गोंदकर, राकेश कोते, चंद्रकांत गोंदकर आदी उपस्थीत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com