
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दिपावली निमित्त संस्थान आस्थापनेवरील पात्र असणार्या कायम व कंत्राटी कर्मचार्यांना त्यांच्या मागील वर्षातील एकुण वार्षिक वेतनाच्या 8.33 टक्के इतके सानुग्रह अनुदान देण्यास राज्यशासनाने मान्यता दिली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, साईबाबा संस्थानच्या कर्मचार्यांना 1977 पासून सानुग्रह अनुदान प्रत्येकदिवाळीपुर्वी दिले जाते. त्याअनुषंगाने याही वर्षी संस्थान कर्मचार्यांना एकूण वेतनाच्या 8.33 टक्के दराने होणारी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देणेबाबत व्यवस्थापन समितीने दि. 20 जुलै 2022 रोजीचे सभेत मान्यता दिली होती. तथापि सदरचे सानुग्रह अनुदान कर्मचार्यांना अदा करण्यापुर्वी विधी व न्याय विभाग यांची मान्यता घेण्यात यावी असे ठरले.
त्यानुसार सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असता संस्थानच्या आस्थापनेवरील पात्र असणार्या कायम (स्थायी) व कंत्राटी (अस्थायी) कर्मचार्यांना माहे ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील त्यांच्या एकुण वार्षिक वेतनाच्या 8.33 टक्के इतके सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात येत असल्याचे विधी व न्याय विभागाने कळविले असल्याचे सांगुन संस्थानच्या सर्व कर्मचार्यांना दिपावलीच्या शुभेच्छा ही श्रीमती बानायत यांनी दिल्या.