
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थानमधील सेवेत असलेल्या 598 कर्मचार्यांना 1052 कर्मचार्यांप्रमाणे कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आयोजित केली असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली.
साईबाबा संस्थानमध्ये सेवेत असलेल्या 598 कर्मचार्यांना 1052 कर्मचार्यांप्रमाणे सेवेत कायम करावे याबाबत गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्षाचे नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. या कर्मचार्यांना देण्यात येणारे वेतन अत्यंत तुटपुंजे असल्यामुळे आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी भागावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. या कर्मचार्यांना कायम करावे यासाठी अनेकदा आंदोलने उभारण्यात आली. या प्रश्नासाठी विविध राजकीय नेत्यांनी अनेकदा प्रयत्नही केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून 1052 कर्मचार्यांना कायम करण्यात आले. 598 कर्मचार्यांना कायम करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
मुख्यमंत्री यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी काही दिवसापूर्वी शिर्डीत हजेरी लावली. त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी मुख्यमंत्री यांना 598 कर्मचार्यांना साईबाबा संस्थान सेवेत कायम करावे, असे निवेदन दिले होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा केली होती. याबाबत खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन 598 कर्मचार्यांना कायम करावे तसेच जोपर्यंत या कर्मचार्यांची नियमित नियुक्ती होत नाही.
तोपर्यंत मंजूर आकृतीबंधानुसार परिशिष्ट अ मध्ये विविध पदासाठी मंजूर असलेले वेतनानुसार महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी होणार्या वेतन वाढीनुसार मासिक वेतन फरक कर्मचार्यांना देण्यात यावे व वैद्यकीय सवलत आणि वैद्यकीय बिल परतावा मिळावा तसेच प्रलंबित शैक्षणिक फी देखील मिळावी अशा विविध मागण्यांची शिफारस खा. लोखंडी यांच्याकडे कर्मचार्यांनी केली होती. त्या अनुषंगाने खा. लोखंडे यांनी मुख्यमंत्री यांना याबाबत पत्रव्यवहार केला होता. जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती कमलाकर कोते यांनी दिली.