साई संस्थान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कंत्राटी कर्मचारी रजा व सुट्ट्यांपासून वंचित

साई संस्थान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कंत्राटी कर्मचारी रजा व सुट्ट्यांपासून वंचित

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे 2 हजार कंत्राटी कर्मचारी हक्काच्या राजा व सुट्ट्यांपासून वंचित राहिले आहे. शासनाच्या अधिनियमानुसार संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची कंत्राटी कर्मचार्‍यांनी मागणी केली आहे.

श्री साईबाबा संस्थानमध्ये गेल्या 18 वर्षांपासून जवळपास दोन हजार कंत्राटी कर्मचारी विविध विभागात काम करत आहेत. महाराष्ट्र शासन दुकाने व आस्थापना (नोकरी व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियमन 2017 शासन अधिनियमानुसार लागू असलेल्या शासकीय सुट्ट्या व किरकोळ रजा लागू केल्या नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

कायम कर्मचार्‍यांप्रमाणेच कंत्राटी कर्मचारी दैनंदिन कामकाज करतात. असे असताना या कंत्राटी कर्मचार्‍यांना सुट्ट्या देण्यामध्ये दुजाभाव केला जात असल्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय किंवा खासगी कामासाठी अचानक रजा घ्यावी लागते. परंतु संस्थान प्रशासनाकडून या कर्मचार्‍यांना हक्काची रजा किंवा सुट्टी दिली जात नाही. परिणामी त्यांना कामावर येता न आल्यामुळे त्यांना मिळणार्‍या तुटपुंज्या पगारातून त्यांनी घेतलेली रजा किंवा सुट्टीच्या दिवसाची पगारातू कपात करण्यात येते. त्यामुळे कर्मचार्‍यांना आर्थिक फटका बसतो.

साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेने शासनाच्या जीआरप्रमाणे कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सुट्ट्या व किरकोळ रजा लागू कराव्या याबाबत निवेदन तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. साई संस्थान विधी विभाग व इतर तज्ञ सल्लागारांचे मत या विषयाबाबत घेण्यात आले. त्यांनीही या सकारात्मक अभिप्राय दिले असतानाही 4 महिने उलटूनही याबाबत कुठलेही कारवाई संस्थांकडून करण्यात आली नाही.

त्यामुळे पुन्हा कर्मचारी संघटनेने 10 नोव्हेंबर रोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना करून याबाबत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या. असे असतानाही साई संस्थान प्रशासनातील काही अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे कंत्राटी कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कार्यवाई करताना दिसत नाही. त्यामुळे काही अधिकारी शासनाच्या नियमांची पायमल्ली करत आहे. साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचार्‍यांना अनेक वर्ष हक्काची रजा व सुट्ट्या मिळण्याकरिता वाट पाहावी लागते ही दुर्दैवाची बाब असून नव्या वर्षात प्रभारी कार्यकारी अधिकारी जाधव हे कंत्राटी कर्मचार्‍यांना आनंदाची बातमी देतील, अशी अपेक्षा कंत्राटी कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com