साई संस्थानवर तातडीने विश्वस्त मंडळ नेमावे

पालकमंत्र्यांना निवेदन; मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे दिले आश्वासन
साई संस्थानवर तातडीने विश्वस्त मंडळ नेमावे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

विश्वस्त मंडळाची मुदत संपून एक वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. सध्या उच्च न्यायालयाने नेमणूक केलेली तदर्थ समिती

असल्याकारणाने संस्थानच्या विकास कामात बर्‍याच अडचणी येत असून विकासकामे खोळंबली आहेत. त्यामुळे साईबाबा संस्थानवर तातडीने विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डी शहराच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, युवक तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, निलेश कोते, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, निलेश शिंदे, दिपक गोंदकर, साई कोतकर, अमोल बानाईत आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, संस्थानवर तदर्थ समिती कामकाज करत असल्यामुळे अनेक अडचणी येत असून विकासकामे खोळंबली आहेत. महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले असून महामंडळ तसेच विविध शासकीय कमिटी यांच्या नेमणुका अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

जागतिक करोना महामारीमुळे महामंडळ तसेच शासकीय कमिटी यांच्या नेमणुकीस विलंब झाला असेल मात्र आता सदरील नेमणुका तातडीने करण्यात याव्यात. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ लवकरात लवकर नेमणूक करण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालावे व शिर्डीतील 50 टक्के स्थानिकांना विश्वस्त मंडळात स्थान देण्यात यावे, जेणेकरून भाविकांच्या समस्यांची स्थानिकांना जाण असल्याकारणाने भक्तांच्या गैरसोय व अडचणी होणार नाहीत अशी मागणी निवेदनपत्रात करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com