नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण

साई मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन || ठिकठिकाणी लाडू विक्री केंद्राची सुविधा
नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यानिमित्ताने मंगळवार 31 डिसेंबर 2022 रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

श्री. जाधव म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या साईभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात 10 हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा व भक्तनिवासस्थान (500 रुम) या ठिकाणी 28 हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे.

साईभक्तांकरिता सुमारे 350 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पाकिट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्प्लेक्स, गेट नंबर 5, साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तसेच दर्शन रांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दूध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (500 रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शन रांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांग, मंदिर परिसर, साईआश्रम व नवीन साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नवीन भक्त निवासस्थान व नवीन साईप्रसादालय येथे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेकामी 1 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपनिरीक्षक, 75 पोलीस कर्मचारी, एक सिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्बशोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त 4 पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 250 पुरुष पोलीस कर्मचारी व 60 महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येवून याव्यतिरिक्त संस्थानचे 1 पोलीस निरिक्षक व 930 सुरक्षा कर्मचारी आहेत.

नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवानिमित्ताने मंगळवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 2 ते 3 यावेळेत जगदिश मारुती पाटील ठाणे, दुपारी 3 ते 4 श्री साई स्वरांजली संगीत संच, नागपूर, दुपारी 4 ते 5.30 यावेळेत विजय पार्सेकर, मुंबई, रात्री 7 ते 8.30 भक्ती साखरकर, मुंबई व 8.30 ते 10 स्वरश्री प्रतिष्ठान (अंध व ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग), मुंबई आदी कलाकारांचे साईभजने व भक्तीगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार असल्याचे सांगून शिर्डी महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या साईभजन संध्या कार्यक्रमांचा जास्तीत-जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com