
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
येथील श्री साई मंदिराच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफ व एमएसएसची सुरक्षा व्यवस्था साई भक्तांच्या दृष्टीने योग्य नसून नवीन सुरक्षा साई मंदिर परिसरात ठेवण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून याबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे, शिर्डी येथील श्री साई मंदिराच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफ किंवा एमएसएसची सुरक्षा लागू करण्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने यासंदर्भात संस्थान प्रशासनाचा अभिप्राय मागितला आहे. मात्र येथे ही सुरक्षा व्यवस्था लागू करण्यासंदर्भात ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन यासंदर्भात तीव्र विरोध केला आहे.
साई मंदिरासाठी एसआरपीएफ व एमएसएस सुरक्षा प्रत्येक साईभक्तांकडे व सामान्य भाविकांकडे संशयाने बघेल. त्यामुळे ग्रामस्थ व साई भक्तांच्या भावना दुखावल्या जातील किंवा भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. ही सुरक्षा व्यवस्था लागू झाली तर त्याच्या कठोर अमंलबजावणीमुळे येथे रोज वादावादी होण्याची व अशांतता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
साई मंदिर हे धार्मिक क्षेत्र आहे. येथे भावनांना किंमत आहे. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था साई संस्थानला लागू करणे योग्य नाही. ठराविक कार्यकर्ते वारंवार न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून येथील विकासावर देखील परिणाम झाला आहे. येथे असुरक्षितता व गुन्हेगारीचा मुद्दा पुढे करून या सुरक्षा व्यवस्थेचा घाट घातला जात आहे. मात्र मंदिर परिसरात आजवर कोणत्याही मोठ्या स्वरूपाची घटना घडली नाही. सध्या संस्थानची सुरक्षा यंत्रणा, पोलीस व सेवानिवृत्त सैन्य दलातील बंदूकधारी जवान यांची सुरक्षा यंत्रणा उत्कृष्ट प्रकारे सुरक्षा विभागाचे कामकाज सांभाळत आहे.
त्यामुळे या नवीन सुरक्षा व्यवस्थेची येथे अजिबात गरज नाही. येथे ज्याप्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएसआय अधिकारी नेमणुकीबाबत भ्रमनिरास झाला. तोच एसआरपीएफ किंवा एमएसएस या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील होऊ शकतो. त्यामुळे ही नवीन सुरक्षा व्यवस्था लागू करण्याऐवजी पोलीस संरक्षण व्यवस्था सक्षम आहे. आणखी पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती येथे करावी. साई मंदिर सुरक्षेसाठी एस आर पी एफ व एम एस एस यांची सुरक्षा नियुक्ती करू नये. असा ठराव करून संस्थान प्रशासनाने न्यायालयात सादर करावा, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.
या निवेदनावर भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके , विजय जगताप, रमेश गोंदकर, प्रमोद गोंदकर, ताराचंद कोते, सचिन तांबे, सुजित गोंदकर, हरिश्चंद्र कोते, प्रतापराव जगताप, अॅड. अनिल शेजवळ, बाळासाहेब लुटे, अशोक गायके, अमोल गायके, दत्तात्रय शिंदे, प्रतिक शेळके, सुधाकर शिंदे, सुनील गोंदकर, महेश लोढा, गोकुळचंद ओस्तवाल, साईनाथ गोंदकर, अविनाश गोंदकर, महेश गोंदकर, राजेंद्र कोते, चेतन कोते, रवींद्र कोते, सुनील गोंदकर, पंकज गोंदकर, वैभव कोते आदींसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक समजले जाते. याठिकाणी देश-विदेशातून दररोज लाखो भाविक बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. या ठिकाणी जर शासनाने एसआरपीएफ व एमएसएसची सुरक्षा तैनात केली तर भाविकांच्यादृष्टीने ही सुरक्षा व्यवस्था डोकेदुखी ठरेल. या सुरक्षा व्यवस्थेमुळे भाविकांना चांगल्या प्रकारची वागणूक मिळणार नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेत आणखी वाढ करून सध्या आहे तीच सुरक्षा व्यवस्था ठेवली तर भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुलभ होईल.
- कमलाकर कोते, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिवसेना