लाखो भक्तांनी घेतले साईसमाधीचे दर्शन

साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले
लाखो भक्तांनी घेतले साईसमाधीचे दर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले होते. काल लाखो भाविकांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई व श्री राम मंदीर हा भव्य देखावा व हैद्राबाद येथील साईभक्त रेणुका चौधरी यांच्या देणगीतून करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट साईभक्तांसाठी लक्षवेधी ठरली.

उत्सवाच्या मुख्य दिवशी साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची व साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी विणा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

सकाळी 07.00 वाजता संस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या पत्नी मालती यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी 9 वाजता शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 10 वाजता प्रभंजन भगत यांचे कीर्तन झाले. तसेच सकाळी 10.30 वाजता अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या पत्नी मालती यार्लगड्डा यांच्या हस्ते समाधी मंदिराचे समोरील स्टेजवर आराधना विधी करण्यात आला.

दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता श्रींची धुपारती झाली. तर रात्रौ 7.30 ते 10 यावेळेत शैलेंद्र भारती मुंबई यांचा साई भजन संध्या हा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर झाला. साईप्रसादालयामध्ये साईभक्तांच्या देणगीतून भक्तांना मोफत प्रसाद भोजन देण्यात आले. तसेच बेंगलोर येथील साईभक्तांनी श्रीसाई प्रसादालय करीता रक्कम 30 लाख 50 हजार किंमतीचे एक अत्याधुनिक स्वयंचलित आटा युनिट देणगी स्वरुपात दिले आहे. सदर आटा युनिट मध्ये गहु साफसफाई, निवडणे, दळणे हि कामे स्वयंचलित होणार आहेत. या आटा युनिटव्दारे प्रति तास 1000 किलो आटा उपलब्ध होणार असुन सदर युनिट हे एफएसएसआयचे नियमावली नुसार तयार करण्यात आलेले आहे.रात्री 9.15 वाजता श्रींच्या रथाची शिर्डी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

आज बुधवार दि. 25 ऑक्टोबर रोजी उत्सवाच्या तिसर्‍या दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी 4 ते 6 यावेळेत प्रभंजन भगत यांचे कीर्तन कार्यक्रम श्रींचे समाधी मंदिराच्या उत्तर बाजुचे स्टेजवर होणार आहे. सायंकाळी 6 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री 7.30 ते 9.45 यावेळेत शाहिर उत्तम रामचंद्र गायकर यांचा साईभजन संध्या कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होईल. रात्री 10 वाजता श्रींची शेजारती होणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com