शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या वतीने

भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. बाबांची पहाटे होणारी काकड आरती तसेच रात्रीच्या शेजाआरतीस भाविकांना हजेरी लावता येणार नाही. दर गुरुवारी निघणारा पालखी सोहळा बंद करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.

मंगळवार दि. 23 रोजी दुपारी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईसंस्थानकडून कोव्हिडची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने साई संस्थानकडून खबरदारी म्हणून रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरतीसाठी भाविकांना बंदी घातली आहे. सदरील आरत्या नित्यनेमाने मोजक्याच पुजार्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनंतर तीन आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आलेला साईबाबांचा पालखी सोहळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बायोमेट्रिक दर्शन व्यवस्था गुरुवारी, शनिवार, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी आगाऊ बुकिंग करूनच दर्शनाला यावे, असेे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.