नववर्षाच्या स्वागतानिमित्त साईचरणी 'एवढ्या' कोटींचे दान

आठ लाख साईभक्त साईचरणी लिन
नववर्षाच्या स्वागतानिमित्त साईचरणी 'एवढ्या'
कोटींचे दान

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 25 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत 08 लाख साईभक्तांनी साईसमाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत 17.81 कोटींची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

श्री.जाधव म्हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त दिनांक 25 डिसेंबर 2022 ते दिनांक 2 जानेवारी 2023 याकाळात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून 08 कोटी 78 लाख 79 हजार 48 रुपये, देणगी काउंटरव्दारे 3 कोटी 67 लाख 67 हजार 698 रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्दारे 2 कोटी 15 लाख 18 हजार 493 रुपये, ऑनलाईन देणगीव्दारे 1 कोटी 21 लाख 2 हजार 531 रुपये, चेक/डिडीव्दारे 98 लाख 79 हजार 973 रुपये व मनी ऑडरव्दारे 3 लाख 21 हजार 653 रुपये अशी एकुण 16 कोटी 84 लाख 69 हजार 396 रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे.

तसेच सोने 1 किलो 849 ग्रॅम (रुपये 90 लाख 31 हजार 167 रूपये) व चांदी 12 किलो 696 ग्रॅम (रुपये 6 लाख 11 हजार 478 रूपये) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातुन एकुण 17 कोटी 81 लाख 12 हजार 041 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.

शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत सुमारे 8 लाख साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. ऑनलाईन व सशुल्क दर्शन आरती पासेसव्दारे 1 लाख 91 हजार 135 साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असून याव्दारे 4 कोटी 5 लाख 12 हजार 542 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच याकालावधीत साईप्रसादालयात 5 लाख 70हजार 280 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 11 हजार 255 साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच 8 लाख 54 हजार 220 लाडु प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली. याव्दारे 1 कोटी 32 लाख 19 हजार 200 रुपये प्राप्त झालेले आहे.

तसेच याकालावधीत साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, साईबाबा भक्तनिवास्थान व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे 1 लाख 28 हजार 52 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 16 हजार 207 साईभक्तांची अशी एकुण 1 लाख 44 हजार 259 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली होती.

तसेच दिनांक 31 डिसेंबर 2022 व 1 जानेवारी 2023 या याकालावधीत 171 रक्तदाते साईभक्तांनी रक्तदान केलेले आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधाकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचे ही श्री.जाधव यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com