साई संस्थानने ऑफलाईन दर्शन पास सुविधा सुरु करावी - कोते

साई संस्थानने ऑफलाईन दर्शन पास सुविधा सुरु करावी - कोते

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याची आस लागलेल्या साईभक्तांना दर्शनासाठी ऑन लाईन दर्शन पास काढताना अनेक अडचनींचा सामना करावा लागत असल्याने आता ऑन लाईन पासेस बरोबरच ऑफलाईन दर्शन पास सुविधा साईंसंस्थान प्रशासनाने तातडीने सुरू करावी अशी मागणी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते पाटील यांनी केली आहे .

दिपावलीच्या लक्ष्मीपुजनानंतर देशाच्या विविध भागातून भाविकांना शिर्डीत येवून साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. करोनाचे सावट कमी झाल्यानंतर साईबाबांचे समाधी मंदीर भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन दर्शनपास सक्ती करण्यात आल्याने भाविकांना अनेक संकटाचा समाना करावा लागत आहे.

ऑनलाईन दर्शनपास काढण्यासाठी भाविकांना तासंतास कसरत करावी लागते.दिवसभरात अनेकदा साईसंस्थानची वेबसाईट बंद पडते किंवा हँग होते. त्यामुळे ऑनलाईन पासेसचा हा नियम भाविकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. भाविकांबरोबर १० वर्षाखालील मुलांना प्रवेश नसल्याने त्याचीही मोठी अडचन भाविकांसमोर आहे. माहीती तंत्रज्ञानाची माहीती नसलेल्या भाविकांचाही विचार मंदीर प्रशासनाने केलेला नाही. शिर्डीत आल्यावर ऑनलाईन पासेससाठी भाविक दोन तीन दिवस वनवन करतांंना आढळून येत आहेत. त्यामुळे काही लोकांनी ऑनलाईन पासेस उपलब्ध करून देण्यात गोरख धंदा सुरू केला आहे .

भाविकांना सुकर दर्शनासाठी ऑनलाईन पासेस बरोबरच ऑफलाईन दर्शन व्यवस्था साईबाबा संस्थान प्रशासनावे तातडीने सुरू करावी. ऑनलाईन दर्शन पासेससाठी एस.टी स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट , भक्त निवास यासह संस्थान परिसरात विविध ठिकाणी काउंटर सुरू करावीत, त्यासाठी भरपुर मनुष्यबळ साईसंस्थानकडे आहे. परराज्यातून सहकुटूंब भाविक शिर्डीत येत असल्याने त्यांच्याकडील असलेल्या लहान मुलांमुळे दर्शनासाठी अडचन येत असल्याने नियमावलीत लहान मुलांना सुट देण्यात यावी अशी मागणी भाविकांमधुन व्यक्त होत असल्याने मंदीर प्रशासनावे भाविकांच्या सुकर दर्शनासाठी तातडीने ऑफलाईन दर्शनाबरोबरच लहान मुलांनाही मंदीरात जाण्याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी कैलासबापू कोते यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com