आजपासून शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळा

आजपासून शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थान, नाट्य रसिक संच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरूवार 17 ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत साईआश्रम (1 हजार रुम) येथील शताब्दी मंडपात साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी दिली.

श्रावण मासानिमित्त दरवर्षी साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या पारायण सोहळ्याचे हे 29 वे वर्ष आहे. त्यानुसार आज 17 ते 24 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 7 ते 11.30 यावेळेत पुरुष वाचक व दुपारी 1 ते 5 महिला वाचक श्री साईसच्चरित पारायण वाचन होईल.

यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रथम दिवशी आज सकाळी 6.30 वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक, ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सायंकाळी 4 ते 6 भक्ती संध्या सिध्दार्थ अवधुत थत्ते, पुणे यांचा मराठी व हिंदी भजन, अभंग भक्तीगित, रात्रौ 7.30 ते 9 भटवाडी साईदर्शन भजन मंडळ, नितीनबुवा करगुटकर, मुंबई यांचा भक्तीगीत, भजनाचा कार्यक्रम हनुमान मंदिराच्या शेजारील शताब्दी मंडपात होणार आहे. 18 रोजी सायं.5 ते 6 पारायणार्थी महिला मंडळ, शिर्डी यांचा हळदी कुंकू समारंभ व सायं. 7.30 ते 9.30 साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श प्राथमिक विद्यामंदीरातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 19 ऑगस्ट रोजी सायं.4 ते 6 निनाद ग्रुप पद्मावती पारेकर, पुणे यांचा भावगीत, भक्तीगीत, सायं. 7.30 ते रात्रौ 9.45 मिशन साई रूद्रा, नरेंद्र नाशिककर यांचा वंदन श्री साईचरित्रा संगितमय कार्यक्रम होईल. 20 रोजी सायं. 4 ते 6 साई-स्वर नृत्योत्सव विजय साखरकर, मुंबई, यांचा साईगीतांवर आधारीत नृत्यमय कार्यक्रम व सायं. 7.30 ते रात्रौ. 9.45 कान्ह ललित कला केंद्र, मिलन भामरे, जळगांव यांचा भावयात्रा कार्यक्रम होईल. 21 ऑगस्ट रोजी सायं. 4 ते 5.45 वंदनाताई आंधळे, उंबरे-राहूरी यांचे प्रवचन व 7.30 ते 9.45 निनाद अनिल शुक्ल, पुणे यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.

22 रोजी सायं. 4 वा. संत वाडःमय मंडळ प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी, पुणे यांचे संगीत प्रवचन व 7.30 ते 9.45 श्रीसाई श्रध्दा कला मंच, साई मित्र परिवार, अतुल गौळकर, हिंगणघाट, जि. वर्धा यांचे संगीतमय साईभजन होईल. 23 ऑगस्ट रोजी सायं. 4 ते 6 समिरण दिलीप बर्डे, पुणे यांचा मराठी-हिंदी भक्तीगीत व 7.30 ते 9.45 साई सरगम, अनंत पांचाळ, मुंबई यांचा भक्ती संगीत कार्यक्रम होईल. गुरूवार 24 रोजी दुपारी 3.30 ते 7.30 वाजता गावातून साईसच्चरीत्र ग्रंथ मिरवणूक व मिरवणूक परत आल्यानंतर होईल. तसेच दुपारी 3 ते 4 गोरक्षनाथ नलगे व 4 ते 5 आशाबाई भानुदास गोंदकर यांचे प्रवचन होईल. गुरूवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते 8.30 पुरुष वाचक व 9 वाजता महिला वाचक अध्याय क्रमांक 53 अवतरणिका वाचन होऊन ग्रंथ समाप्ती होणार आहे. शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. साईआश्रम शताब्दी मंडपात माधवराव तुकारामपंत आजेगांवकर, परभणी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर दुपारी 12 ते 4 यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व 18 वर्षांच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच 2 तास अखंड विणा सेवेसाठी इच्छुकांनी आपली नावे नोंदणी कार्यालयात नोंदवावीत तसेच पारायण प्रारंभ मिरवणुकीमध्ये तस्बीर, कलश व पोथी घेण्याचा मान लकी ड्रॉ पध्दतीने ग्रामस्थ, साईभक्तांना देण्यात येणार असून याची नोंदणी संस्थान देणगी कार्यालयात 16 ऑगस्टपर्यंत असेल. या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्त व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले आहे. हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष न्याया. सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, नाट्य रसिक संचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com