साई सुपर रुग्णालयासमोर परिचारिका व परिचारक यांचे कामबंद आंदोलन

आंदोलकांवर कारवाई करत नंतर सोडून दिले
साई सुपर रुग्णालयासमोर परिचारिका व परिचारक यांचे कामबंद आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व परिचारक तसेच पॅरामेडीकल स्टाफ यांनी संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करावे, समान काम समान वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मंगळवारी जागतिक परिचारिका दिनी संस्थानच्या रूग्णालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले होते. या कंत्राटी आरोग्य सेवकांचे हे काम बंद आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर कारवाई करून सोडून दिले, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली.

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय व साईनाथ रुग्णालय या दोन्ही रुग्णालयातील इनसोर्स व आउटसोर्स परिचारक व परिचारिका यांनी काल जागतिक परिचर्या दिनी सुपर स्पेशालिटी रुग्णालय समोर कामबंद आंदोलन केले होते. संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे किंवा आरोग्य सेवेतील कायम कर्मचार्‍यांप्रमाणे किमान 44 हजार 900 रुपये वेतन द्यावे तसेच करोना महामारीच्या या साथ व संसर्गजन्य आजारात आणि जीवाची पर्वा न करता काम करत असून आम्हाला कुबेर अथवा इतर आजाराचा संसर्ग झाल्यास बाहेरील हॉस्पिटल उपचाराची व मेडिकेशन गरज पडल्यास तेथील बिलाचा परतावा मिळावा तसेच आठवडा सुट्टी व्यतिरिक्त किमान चार पगारी सुट्ट्या लागू कराव्यात या मागण्या आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांनी संस्थांकडे केल्या आहेत.

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या आंदोलनाला परवानगी नसून करत असलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई करीत असताना पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर 188 प्रमाणे कायदेशीर कारवाई करून नंतर त्यांना सोडून दिले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कायम कर्मचार्‍यांच्या तुलनेत कामाच्या मानाने आमचे पगार खूप कमी असून त्या संदर्भात व इतर मागण्यांसाठी आम्ही मागील दीड-दोन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहोत.

आम्ही गेली दहा-पंधरा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने संस्थानच्या रूग्णालयात कार्यरत आहे. गेल्या वर्षभरापासून आपल्याकडे करोना महामारी चालू आहे. त्यामध्ये आम्ही आमचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा संपूर्ण निस्वार्थपणे देतोय आणि जिथे कायम कर्मचारी पन्नास ते साठ हजार पेमेंट घेताय तिथे आमच्या हातात फक्त 15 हजार पेमेंट दिले जाते. आम्ही करोना पेशंटची केअर घेण्यासाठी पुर्णपणे सक्षम आहे. संस्थानने आमच्या मागण्यांचा विचार करावा आमच्या मागण्यांची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आमचं हे काम बंद आंदोलन असेच पुढे चालू ठेवणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com