शिर्डी | Shirdi

सबका मालिक एक हा जगभर संदेश देणारे श्री साईबाबा यांच्या शिर्डी येथील विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने दरवर्षी छपाई करण्यात येणार्या

लाखो साई दिनदर्शिका तसेच दैनंदिनी पुस्तिकेच्या प्रती चालू वर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाला तरीदेखील भाविकांना उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. यामुळे साईसंस्थानच्या प्रकाशन विभाग व कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर टिका-टिप्पणी होत आहे. उच्च न्यायालयाची परवानगी अद्यापही मिळाली नसल्याने जगभरात पोहचलेली साई दैनदिनी वादाच्या भोवर्यात सापडली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील दोन वर्षापूर्वी डायरी व दिनदर्शिकेच्या 2 लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आणि त्याच्या विक्रीतून संस्थानला सुमारे 2 कोटी 80 लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले होते. मागील वर्षी 2 लाख 25 हजार प्रती विक्री करण्यात आल्या. यातून संस्थानला 2 कोटी रुपये मिळाले. मात्र चालू वर्षी उशीर झाला आहे. प्रकाशन विभागाकडून उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र आयएएस दर्जाचा अधिकारी साई संस्थानच्या कारभाराचा गाडा हाकत असेल तर अशा महत्वाकांक्षी गोष्टीकडे बारकाईने बघणे गरजेचे आहे. तदर्थ समितीच्या मान्यतेने सन 2021 या चालू वर्षासाठी संस्थानच्या प्रकाशन विभागाने 1 लाख 50 हजार प्रति छपाईसाठी दिल्या असून साई दैनंदिनी डायरीच्या किंमतीत मागील वर्षी पेक्षा 20 रुपयांनी घट करून तिचे विक्री मूल्य 70 रुपये करण्यात आले असल्याचे सांगितले.

नवीन वर्षाच्या डायरीत रकमेच्या तुलनेत काही बदल केले आहे का हे मात्र समजले नाही. असे असले तरी उच्च न्यायालयाची परवानगी अद्यापही मिळाली नसल्याने साईबाबा संस्थानच्या डायरी यंदा भाविकांना मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मिळाली तरी संस्थानचा कधीही न झालेला तोटा भरून निघणार नाही.

साईबाबांच्या डायरीला देशविदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येकाला घरोघरी हवी ती माहिती मिळत असली तरी कुठला सण केव्हा आणि त्या दिवशी तिथी कोणती आहे. थोर पुरुषांची आणि संतांची पुण्यतिथी, जयंती यासह प्रत्येक महिन्यातील राशीभविष्य व दैनंदिन जीवनात लागणार्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी आज घरोघरी दिनदर्शिका आणि दैनंदिन डायरी शिवाय पर्याय नाही.

2020 वर्ष संपून एक महिना उलटला आहे. तरीदेखील देशातील श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या साईबाबा संस्थान प्रशासनाने अद्यापही जगभरातील भाविकांना साई दिनदर्शिका आणि साईबाबांची दैनंदिन डायरी प्रकाशित करून उपलब्ध करून दिली नाही. यामुळे लाखो भाविकांनी संस्थान प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवीन वर्षांला प्रारंभ होताच घरोघरी, सरकारी, निमसरकारी कार्यालयातील भिंतीवर दिनदर्शिका लावल्या आहे.

या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. बाजारात आगळेवेगळे स्वरूप देऊन विविध प्रकाशकांच्या दिनदर्शिका बाजारात विक्रीसाठी आल्या. मात्र साई संस्थानच्या दिनदर्शिका व दैनंदिनी याचे महत्त्व लक्षात घेता उशिरा का होईना भाविकांना त्या प्रिय राहणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत साई दिनदर्शिकेचा खपही वाढू लागल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगळे काही तरी देण्याचा प्रयत्न करीत आहे.

साईबाबांची दिनदर्शिका आणी डायरी लाखो भाविकांच्या पसंतीस उतरली आहेे.परंतु साईसंस्थानकडून तांत्रिक कारणाने छपाईसाठी विलंब झाल्यामुळे यावर्षी देशविदेशातील साईभक्तांच्या आनंदावर विरजण पडले असून भिंतीवर साईदिनदर्शिका दिसेल की नाही हा प्रश्न निरुत्तर आहे.