साईभक्तांकडून वेगवेगळे टीकात्मक पडसाद

साईभक्तांकडून वेगवेगळे टीकात्मक पडसाद

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थांनकडे मागणी नोंदविल्यानंतर घरबसल्या नि:शुल्कपणे साईबाबांची उदी प्रसाद दिली जाणार आहे, उदी संदर्भात मागणी नोंदविण्यासाठी साईबाबा संस्थानने व्हॉट्सअ‍ॅप नंबर साईभक्तांसाठी दिला असून या नंबरचे मोबाईल फोनवर व्हॉट्सअ‍ॅपला प्रोफाईल पिक्चर म्हणून अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्काराचा फोटो ठेवण्यात आला. हा नंबर समाज माध्यमांच्या माध्यमातून आज देश-विदेशात सर्वत्र गेला आहे परंतु साईबाबा संस्थानने व्हॉट्सअ‍ॅप नंबरचे डीपीला साईबाबांचा फोटो अथवा साईसंस्थानचा लोगो असण्याऐवजी संस्थानचे अधिकारी व कर्मचार्‍यांचा फोटो ठेवण्यात आल्याचे साईभक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असून वेगवेगळे टीकात्मक पडसाद उमटले आहेत.

साईबाबांच्या उदी मागणीसाठी दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल क्रमांकावर भाविकांचे पत्ते मागविले जात असून या व्हॉट्सअ‍ॅप मोबाईलच्या डिपीला वास्तविक पहाता साईबाबांचा फोटो किंवा साईबाबा संस्थानचा लोगो असणे गरजेचे असताना या डिपीला अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार करतानाचा फोटो नेमका ठेवलाच कसा ? हा फोटो ठेवून नेमका कुणाचा प्रचार आणि प्रसार यावर जोर दिला जात आहे ? असा सवालही साईभक्तांनी सोशल माध्यमांद्वारे उपस्थित केला आहे. साईभक्तांना उदी घरपोहच देण्याची ही संकल्पना नक्कीच चांगली आहे.

त्याबद्दल संस्थानचे कौतुक केलेच पाहिजे, मात्र साईबाबांच्या फोटोला बाजूला सारून संस्थानच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरला कर्मचारी तसेच अधिकारी स्वतःचे फोटो लावत असतील तर ते चुकीचे आहे. त्याठिकाणी साईबाबांचा फोटो किंवा संस्थानचा लोगो असावा अशी अपेक्षा साईभक्तांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पडसाद उमटताच या नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅप डिपीवरून अधिकारी व कर्मचारी यांचा सत्काराचा फोटो हटविला गेला.

दरम्यान ही चूक संस्थानच्या आय टी विभागाचे नजरेतून कशी काय सुटली ? की नको झंझट म्हणून दुर्लक्ष तर केले गेले नाही ना ? किंंवा सर्व काही लक्षात आले असतानाही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले तर नाही ना ? असे एक ना अनेक सवाल संस्थानच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चिले जात आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com