
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबांच्या आरती पासचा काळाबाजार रोखण्यासाठी यापुढे आरती पाससाठी कोणाची शिफारस चालणार नाही. संस्थान कर्मचारी व ग्रामस्थांना देखील दर्शन घेण्याकरिता कडक नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील. साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी मंगळवारी शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेऊन या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाचे साईभक्तांनी तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
मंगळवारी झालेल्या ग्रामस्थ व साई संस्थान प्रशासन बैठकीत दर्शन व आरतीसाठी नियमावली बाबत चर्चा करण्यात आली. यात साई समाधी मंदिरात जनसंपर्क कार्यालय, सुरक्षारक्षक, मंदिर कार्यालय व संपूर्ण परिसरात गेट नं. 1, 2, 3, 4 व 5 याठिकाणी अधिकार्यांव्यतीरिक्त कोणताही कर्मचारी मोबाईल वापरणार नाही. आरतीसाठी मिळणारे सशुल्क पासेससाठी शिफारस सक्तीची होती मात्र ती हटविण्यात आली आहे. द्वाराकमाई, गुरुस्थान, समाधी मंदिर या सर्व ठिकाणचे बॅरिकेट हटविण्यात आले आहे तर ग्रामस्थांसाठी गेट नं. 3 हे गावकरी दर्शन प्रवेश गेट असणार आहे.
मात्र याठिकाणी फक्त शिर्डी ग्रामस्थांना प्रवेश असणार असून प्रत्येकाचे ओळख पत्र तपासूनच प्रवेश देऊन त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही गेटने प्रवेश करून कोणीही आपले नातेवाईक, मित्र व अन्य व्हीआयपी विनापास प्रवेश केल्यास त्याठिकाणी तैनात असणार्या सुरक्षारक्षक व कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणताही ग्रामस्थ विनापास प्रवेश करून आपल्यासोबत असणार्या लोकांना विना दर्शन पास दर्शनासाठी आग्रह करत असेल तर त्याच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार साई संस्थान प्रशासनाला आहे.
त्याची त्वरित अंमलबजावणी बुधवारपासून लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली. ही नियमावली सर्वांसाठी एक सारखी असणार आहे. या निर्णयामुळे अनेक अपप्रवृत्तीला चाप बसणार असून दर्शनाचा काळाबाजार, व्हीआयपी सशुल्क पासेसचा गोरखधंदा व फुकट दर्शन घडवून आणून दररोजची कमाई करणार्या टोळ्यांवर व त्यात सामील असणार्या कर्मचार्यांवर कारवाईची संक्रात आली आहे.
राहुल जाधव यांच्या धाडसी निर्णयामुळे साई संस्थान मधील नियम धाब्यावर बसवणारे अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी जाधव यांची धास्ती घेतली असून या निर्णयामुळे शिर्डी ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यावरही अंकुश आला आहे. त्यामुळे संस्थांनच्या कारभारात नक्कीच पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. यामूळे गुन्हेगारीवर आळा बसणार आहे. नवीन दर्शनरांग लवकरच सुरू होणार असून त्यामध्ये काही सूचना आल्या असून त्यावर अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन प्रत्तेक भाविकांच शांत, सुलभ व सुरक्षित दर्शन कसे होईल यावर भर दिला जाणार आहे.
शिर्डी शहरात चैतन्याचं वातावरण निर्माण होऊन येणारा प्रत्येक भाविक हा आनंदाने दर्शन करूनच स्वगृही जाईल हाच आमचा विश्वास आहे. यासाठी त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लागड्डा, जिल्हाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यानेच हे निर्णय होऊ शकले असे राहुल जाधव यांनी सांगितले. या बैठकीत शिवाजी गोंदकर, अभय शेळके, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, ताराचंद कोते, नितीन कोते, सुजित गोंदकर, दत्तात्रेय कोते, विजय गोंदकर, सचिन चौगुले, अमोल गायके, अशोक गायके, जगन्नाथ कोते, रवींद्र गायके, दीपक वारुळे, सदाशिव गोंदकर, प्रतीक शेळके, दत्ता शिंदे,गणेश कोते, अजय नागरे, सचिन गोंदकर, तसेच शिर्डी युवा ग्रामस्थ व छत्रपती शासन सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
साई मंदिर परिसरात साई भक्तांना तात्काळ दर्शन व आरती मिळवून देतो असे सांगणार्या व दर्शनाच्या नावाखाली गैरकृत्य करणार्या व्यक्तींचा शोध घेऊन शिर्डीतील तरुणांनी दोन दिवसापूर्वी चांगलाच चोप दिला होता. या गोष्टीची दखल घेऊन साई संस्थान प्रभारी कार्यकारी अधिकारी जाधव यांनी मंगळवारी ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन साईभक्तांना सुलभ दर्शन घेता यावे व दर्शन व आरती पासचा काळाबाजार रोखण्याकरिता कडक नियमावली तयार केली. परंतु संस्थान प्रशासनाने भक्तांना दर्शन घेण्याकरिता तयार केलेली नियमावली ही कागदावरच न राहता तिची कायमस्वरूपी अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा साईभक्तांनी व्यक्त केली आहे.
साई संस्थांनच्या इतिहासात प्रथमच या निर्णयामुळे सर्वांना शिस्त लागणार असून मंदिरात व मंदिर परिसरात चालत आलेल्या गैरकृत्याला यामुळे कायमचाच पायबंद बसणार असून सर्वांनाच या नियमाची आचारसंहिता लागू असल्याने शिर्डीत समाधानाचे वातावरण नक्कीच निर्माण होईल.
- अभय शेळके, शिर्डी