साईभक्तांना ऑनलाईन फसवणुकीचा फटका

साईबाबा संस्थानकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
साईभक्तांना ऑनलाईन फसवणुकीचा फटका

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

सध्या ऑनलाईन व्यवहाराचा तसेच ऑनलाईन पध्दतीने हॉटेल रुम बुकींग आणि इतर सुविधा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. आता हे लोण थेट साईभक्तांपर्यंत पोहचले आहे. शिर्डीला येणारे भाविक विश्वासाने साईबाबा संस्थानच्या भक्त निवासातील रुम बुक करणे पसंत करतात. साई संस्थानकडूनही भक्तांना ऑनलाईन बुकींग करुनच शिर्डीत येण्याचे आवाहन केले जाते. मात्र साईभक्तांच्या आस्थेला आणि खिशाला कात्री लावण्याचे काम ऑनलाईन फसवणूक करणार्‍यांकडून आता केलं जात आहे.

साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातील खोल्या बुक करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एक मोबाईल नंबर दिला गेला आहे. साई संस्थानमार्फत चालविल्या जाणार्‍या द्वारावती भक्त निवासाचे फोटोही टाकण्यात आले आहेत. रुम बुकींगसाठी फोन केल्यानंतर रुम बुक करण्यासाठी क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करा, असे समोरुन सांगितले जाते. इतर फसवणुकीच्या व्यवहारात जशी ‘ओटीपी’ची पध्दत वापरली जाते ती येथेही फसवणूक करणारे वापत आहेत. साई संस्थानचा कर्मचारीच आपल्याला मार्गदर्शन करत आहे, असे समजून देशभरातून येणारे काही भाविक या फसवणुकीला बळी पडत असल्याचे उघड झाले आहे. साईबाबा संस्थानच्या आयटी विभागाच्या लक्षात आल्यानंतर कर्मचार्‍यांनी त्या फेक वेबसाईटवर जावून त्याचे व्ह्युव चेक केले.

द्वारावती भक्तनिवास या नावाची गुगलवरील ही वेबसाईट फेक असून साई संस्थानची online.sai.org.in ही अधिकृत वेबसाईट असून साई संस्थानच्या कुठल्याही सुविधेविषयी माहिती पाहिजे असेल तर वरील वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहनही साई संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे. मुंबई आणि दिल्ली येथील काही भाविकांनी फसवणूक झाली असल्याची तक्रार संस्थानकडे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी तातडीने दखल घेत द्वारावती भक्त निवासच्या नावाने फेक वेबसाईट बनवून भाविकांना लुटणार्‍यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश संस्थानच्या आयटी विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली, अन्नदानाच्या नावाखाली भाविकांना लुटत असेल तर त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करणार आहे.

याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानचे आयटी विभागाचे प्रमुख अनिल केशवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

मुंबईतील जय शर्मा यांनी असेच बुकींग केले. मात्र ते शिर्डीला आले असता त्यांनी द्वारावती भक्त निवासाच्या बुकींग काऊंटरवर जाऊन चौकशी केल्यानंतर तसे बुकींगच झाले नसल्याचे समोर आले. ज्या मोबाईल नंबरवर संभाषण करत रुम बुक केली गेली, त्यावर पुन्हा फोन केला असता अश्लिल शिवीगाळ केली जात असल्याचे भविकाकडून सांगण्यात आले. महिन्याभरापासून साई संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासच्या नावाने एक फेक वेबसाईट तयार करून मुंबई, दिल्लीसह अनेक राज्यातील भाविकांची रूम बुकिंगच्या नावाखाली लूट सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com