विठुराय आणि साईदर्शन रात्रीचे बंद

विठुराय आणि साईदर्शन रात्रीचे बंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्र 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू केल्यामुळे रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान लाखो वारकर्‍यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरही रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे.

श्रीमती बानायत म्हणाल्या, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 5 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2021 पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले होते. आता पुन्हा राज्यातील करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.

यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू केलेली आहे. त्याअनुषंगाने संस्थानच्यावतीने सकाळी 6 ते रात्री 9 यावेळेत भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी समाधी मंदिर खुले राहणार आहे. तसेच रात्री 10.30 वाजताची श्रींची शेजारती व पहाटेची 4.30 वाजताची काकड आरती नियमित होणार असून याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

राज्यात जमावबंदी लागु असल्यामुळे संस्थानचे श्री साईप्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅन्टींन आदी सुविधा रात्री 9 वाजेनंतर बंद राहणार आहेत. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. तसेच साईभक्तांनी कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com