साईदर्शन मिळावे म्हणत त्रस्त भाविकांचा चार नंबर गेटवर ठिय्या

ऑनलाईन दर्शन बुकींग करताना खात्यातून पैसे गेले; पासही नाही
साईदर्शन मिळावे म्हणत त्रस्त भाविकांचा चार नंबर गेटवर ठिय्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करताना बँक खात्यातून पैसे तर गेले मात्र दर्शनाचा ऑनलाईन पास न मिळाल्याने त्रस्त झालेल्या भाविकांनी साईमंदिर परिसराचे प्रवेशव्दार क्रमांक चार समोर ठिय्या करत साईदर्शनाची मागणी केली.

ऑनलाईन दर्शन प्रणालीचा लाभ घेत सोमवारी सकाळी अनेक भाविकांनी दर्शन पास प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पैशाचे ट्रांजेक्शन फेल येत अनेकांना पास मिळाला नाही, परंतु भाविकांच्या खात्यातील रक्कम गेल्याने नाराज भाविकांनी साईमंदिर परिसराचे गेट नंबर 4 गाठले. संस्थान अधिकार्‍यांना बोलवा अशी मागणी केली. या मागणीवर अडून बसलेल्या भाविक व सुरक्षा रक्षक यांच्यात ढकलाढकली झाल्याची चर्चा आहे. 7 ऑक्टोबरला साईमंदिर खुले झाले मात्र कोविडच्या पार्श्वभुमीवर ऑफलाईन पासेस बंद करून फक्त ऑनलाईन 15 हजार भाविकांची संख्या दैनंदिन दर्शनासाठी निश्चित करण्यात आली. मात्र नेहमीप्रमाणे स्लो चालणारी व मध्येच स्टॅन्ड व डाऊन होणारी वेबसाईट याबाबत तक्रार ऐकून घेण्यासाठी कुणीही नाही. यामुळे त्रस्त भाविकांनी गार्‍हाणे कुणाकडे मांडायचे हा प्रश्न उपस्थित होत होता.

सोमवार सकाळपासून ऑनलाईन दर्शन प्रणालीचा लाभ घेणार्‍या शेकडो भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. आपल्या मोबाईल आणि खासगी ठिकाणी ऑनलाईन दर्शनपास काढताना सर्व पूर्तता झाली. मात्र शेवटी पास न मिळाल्याने भाविक हैराण झाले. असे एकदा नाही तर अनेकदा पैसे जाऊनही पास न आल्याने अखेर भाविकांचा संताप अनावर झाला व त्यांनी गेट नंबर चार गाठले. अनेक भाविकांचे पैसे तर गेले मात्र पास न मिळाल्यानं भाविकांनी आम्हाला दर्शनासाठी सोडा अशी मागणी केली.

गेटवरील सुरक्षा रक्षक काहीही ऐकून घेईना. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलवत नसल्याचे पाहून अखेर भाविकांना प्रशासकीय इमारतीत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी सुरक्षा रक्षक भाविक यांच्यात ढकलाढकली झाली. साईबाबांच्या नावाने मोठमोठ्याने घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलवा किंवा साईदर्शनासाठी सोडा, अशी मागणी विविध प्रांतातून आलेल्या भाविकांनी केली. मात्र कुणीही अधिकारी येत नसल्याने अखेर भाविकांनी एकत्रित जमून गेट समोरचं ठिय्या दिला. साईनामाचा जयघोष करत येथील व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

भाविक बराच वेळ बसून होते. यावेळी साईमंदिरचे सुरक्षा अधिकारी यांनी भाविकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र भक्त ऐकत नव्हते अखेर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी स्वतः मध्यस्थी करत ज्या भाविकांचे पैसे कट झाले त्यांना गेट नंबर एक मधून सोडण्याचे जाहीर केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल तीन तासांची भाविकांचा दर्शनासाठीचा ठिय्या अखेर संपुष्टात आला.

भाविकांना काय अपेक्षित होते...!

सकाळपासून या गेटवरून हेलपाटे मारणार्‍या भाविकांची एकच मागणी होती की, आम्हाला साईदर्शन घेऊ द्या किंवा सक्षम अधिकार्‍यांना बोलवा. गेटवरील सुरक्षा रक्षकांना अधिकार कितपत आहेत याबाबत भाविकांना समजले तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलावण्याची विनंती केली. मात्र अधिकार्‍यांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही ही खेदजनक बाब आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com