राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाताळ, सलग शासकीय सुट्ट्या तसेच सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमिवर शिर्डीत

भाविकांची साईदर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता संस्थान प्रशासनाने दर्शन मर्यादा सहा हजाराहून आता 12 ते पंधरा हजार भाविक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

भाविकांना दर्शनासाठी येताना ऑनलाईन पास काढून यावे लागणार आहे. दरम्यान संस्थान प्रशासनाने भाविकांची सुलभ दर्शन व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोव्हिडच्या पार्श्वभुमिवर दर्शन रांगेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास परिस्थिती लक्षात घेता नाईलाजास्तव दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येईल, असे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी म्हटले आहे.

याबाबत सीईओ बगाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शासनाच्या नियमांचे पालन याची दक्षता घेत सहा हजार भाविकांना दर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान गुरुवार, शनिवार, सलग शासकीय सुट्या दरम्यान शिर्डीत भाविकांची सुमारे पंधरा हजारपर्यंत सख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

25 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान शिर्डीत भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता असल्याने दर्शनाची भाविकांची सहा हजाराहुन बारा ते पंधरा हजार पर्यंत संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मात्र नियमावली ठरविण्यात आली आहे. सशुल्क व मोफत पास भाविकांनी अगोदर बुकींग करुन तारीख, वार निश्चित करुनच शिर्डीत दर्शनासाठी यावे लागणार आहे.

सशुल्क पास पाच दिवस अगोदर तर मोफत पास दोन दिवस अगोदर स्वतःच्या ओळखपत्राच्या आधारे ऑनलाइन मिळणार असून त्याची सक्ती असून बिगर पासेस शिवाय दर्शन करता येणार नाही. शिर्डीतील बायोमेट्रिक पासेसची संख्याही ऑनलाइन पासेसच्या संख्येवर अवलंबून असून नाताळाच्या सुट्टीमध्ये ते काउंटर सुद्धा गर्दीअभावी बंद राहू शकते.

त्यामुळे सर्व भाविकांनी नियोजन व बुकिंग करूनच शिर्डीला दर्शनासाठी यावे अन्यथा दर्शनाची गैरसोय होऊ शकते. सुट्टीचे कालावधीत मोफत दर्शनपास वितरण काउंटरवर उपलब्ध असल्यास दुसर्या दिवसाचे मोफत दर्शनपास सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत वितरीत करण्यात येणार आहे.

सुट्यांचे दिवशी बुकींग झालेले दर्शनपास विचार करुन दर्शनाचे मोफत दर्शनपास उपलब्ध राहणार असून नविन वर्षानिमित्त भाविक दरवर्षी पालखी घेऊन येत असतात. यावेळी पालख्या घेऊन भाविकांनी येऊ नये. 65 वर्षापुढील तसेच दहा वर्षाच्या आतील मुलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटीचे पालन करुनच दर्शन दिले जाणार आहे. अभुतपुर्व गर्दी झाल्यास दर्शन रांग प्रसंगी बंद ठेवण्यात येईल, असे बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.