साईनगरीत राखी पौर्णिमेनिमित्त अनोखा वृक्षबंधन सोहळा

साईनगरीत राखी पौर्णिमेनिमित्त अनोखा वृक्षबंधन सोहळा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी साई नगरीमध्ये ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविलेला वृक्ष बंधन एक सेल्फी झाडा सोबत हा उपक्रम भारत सरकारच्या हरित भारत अभियानाला दिशादर्शक ठरेल, असा अभिप्राय यानिमित्ताने अनेक साईभक्त शिर्डीकरांनी दिला आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षाचे महत्त्व हे प्राणवायू देणारे जीवनाधार असे समजले जाते. करोनाच्या या महामारीत तर अविरतपणे ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या वृक्षाची उपयोगिता आणखीच अधोरेखित होताना दिसली. विनामोबदला ऑक्सिजन पुरवठा करणारी वृक्षवल्ली कुठेतरी पुजली जावी व त्या माध्यमातून वृक्षतोडी सारख्या सामाजिक दुर्दैवी शक्तींना आवर घालता यावा या भावनेने आयोजिलेला हा उपक्रम वेगळ्या अर्थाने शिर्डी केवळ एक धार्मिक तीर्थक्षेत्र नसून सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण पूरक आदर्शवाद मांडणारा विचारप्रवाह आहे, असे यानिमित्ताने वृक्षबंधन सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक शिर्डीकर साईभक्तांना वाटले.

स्वच्छ शिर्डी अभियान, हरित शिर्डी प्रकल्प, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, फॅमिली हेल्थ गार्डन, शिर्डी परिक्रमा यासारख्या अनेक आदर्श चळवळी निर्माण केलेल्या ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशनची निश्चितच एका आदर्श सामाजिक संघटनेकडे वाटचाल होताना दिसत आहे असे यानिमित्ताने प्रतीत होते.सर्वसाधारण नागरिक, दीनदुबळे साईसेवक, नि:स्सीम साईभक्त अशा समाजातील सामान्य घटकांबरोबरच विविध क्षेत्रात यश संपादन केलेले डॉक्टर्स, सी ए, वकील, नोकरदार, शिक्षक, मेडिकल चालक, हॉटेल व्यवसायिक, राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्वे या सर्वांनी तयार झालेला नि:स्वार्थ ध्येयवेड्या तरुणांचा समूह हीच या परिवाराची खरी ओळख असे यानिमित्ताने जाणवते. सदर उपक्रमात शिर्डी व परिसरातील असंख्य महिला, युवती व मुलींनी सहभाग नोंदवून वृक्ष पूजन करत असतानाचा त्यांचा सेल्फी सोशल मीडियावर टाकला.

सदर उपक्रमाला साजेशी ऑक्सिजन नावाची एक भावनिक चित्रफित यानिमित्ताने ग्रीन एन क्लीन परिवारातील मणिलाल पटेल व सुनील दवंगे यांनी दिग्दर्शित केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिर्डी नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, मुख्याधिकारी, साईभक्त, शिर्डी ग्रामस्थ यांचे बरोबरच फाऊंडेशनचे अजित पारख, डॉ. जितेंद्र शेळके, मणिलाल पटेल, संजय शिर्डीकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ, सी. ए. प्रसाद वेद, डॉ. धनंजय जगताप, दादासाहेब काळे, सागर वाल्हेकर, मयुर चोळके, प्रा. रघुनाथ गोंदकर, किशोर बोरावके, रवींद्र गोंदकर, ताराचंद कोते, गोपिनाथ गोंदकर आदिंनी विशेष परीश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com