
नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi
साईबाबा संस्थानने शिर्डी विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावर उच्च प्रतिचे हायमॅक्स दिवे लावून साईभक्तांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नांदुर्खी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डीपासून अवघ्या 11 किलोमीटर काकडी गावात असल्याने या विमानतळाच्या सेवेमुळे देश विदेशातील साईभक्त साई दर्शनाला येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात. याच साई भक्ताच्या देणगीतून साई संस्थानचा कोट्यवधी रुपयांचा विविध कामासाठी तसेच साई भक्तासाठी शिर्डीच्या विकासासाठी वापर केला जातो.
शिर्डी विमानतळ मार्गावर फक्त शिर्डी ते करडोबानगर पर्यंत हायमॅक्स दिव्याची सुविधा पुरविली जाते. त्यानंतर नांदुर्खी, कोर्हाळे ते काकडी या वाहनतळ मार्गावर विद्युत खांब असूनही त्यावर विजेचे दिवे नसल्याने रात्री साईभक्तांच्या गाडीला अपघाताला सामोरे जावे लागते. या आधीही अनेक अपघात या वाहनतळ महामार्गावर झालेले आहेत.
रात्रीच्या वेळी वीज असूनही विजेच्या खांबावर हायमॅक्स दिवे नसल्याने काकडीवरून शिर्डीला येतांना काही साईभक्त थेट डोर्हाळे ते कनकुरी या मार्गाने रस्ता सापडत नसल्याने शिर्डीला येतात तर काही कोर्हळे ते केलवड ते राहाता या मार्गाने प्रवास करतात. साईभक्तांचा हा त्रास थांबविण्यासाठी शिर्डी विमानतळ प्राधिकरण व साईबाबा संस्थान यांच्या मार्फत ज्या प्रमाणे विमानतळाच्या चहू बाजूने हाय मॅक्स दिव्याची सुविधा केली आहे ती या शिर्डी वाहनतळ मार्गावर करून साई भक्तांना चांगली सेवा द्यावी.
हाय मॅक्स दिव्याची सुविधा झाली तर रात्रीचा प्रवास साई भक्ताला सुलभ होणार असून यामुळे येणार्या साईभक्तांचा ओघही वाढणार आहे. तरी साई संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी याबाबत त्वरित योग्य निर्णय घेऊन साई भक्तांना हाय मॅक्स दिव्याची सुविधा देण्यासाठी संबंधित प्रस्ताव त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी नांदुर्खी सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव चौधरी, माजी सरपंच राजेंद्र चौधरी, कचेश्वर चौधरी, संजय चौधरी, बाबासाहेब अनर्थे, मोहन दाभाडे, वसंत दाभाडे, बाबासाहेब चौधरी, वसंत चौधरी, नवनाथ उगले, अण्णासाहेब दिघे, भाऊसाहेब चौधरी, संजय चौधरी, अशोक कोळगे, दिलीप शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
सर्व साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी विमानतळ मार्गावर हायमॅक्स दिव्यांची व्यवस्था करण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जातीने लक्ष घालून साईभक्तांसह या परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय टाळावी. त्यांनी विशेष पुढाकार घेऊन या भागात विमानतळ करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. देश विदेशातून येणार्या साईभक्तांसाठी हवाई सेवा उपलब्ध करून दिली. म्हणून शिर्डी विमानतळ मार्गावर हायमॅक्स दिवे त्वरित लावून देण्यासाठी आ. विखे पाटील यांनी संबंधित प्रशासनाला सूचना कराव्यात, अशी मागणी कोर्हाळे, काकडी, नांदुर्खी परिसरातील नागरिकांनी केली आहे.