दोन आठवड्यात संस्थान विश्‍वस्त नेमणुकीसंदर्भात माहिती न दिल्यास अवमानाची कारवाई करु

उच्च न्यायालयाचे आदेश; 22 जून रोजी पुढील सुनावणी
दोन आठवड्यात संस्थान विश्‍वस्त नेमणुकीसंदर्भात माहिती न दिल्यास अवमानाची कारवाई करु

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीला बैठक घेण्याचे औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिले असून संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात माहिती घेण्यासाठी शासनास 2 आठवड्याची मुदतवाढ देत योग्य माहिती न दिल्यास अवमानाची कारवाई करू, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी दिली. पुढील सुनावणी 22 जून रोजी ठेवण्यात आली आहे.

कोवीड-19 चा प्रादुर्भाव व दुसर्‍या लाटेत वाढणारी रुग्णाची संख्या तसेच राज्यात अ‍ॅम्ब्यलुन्सची असणारी कमतरता लक्षात घेता कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिवाणी अर्ज करून साईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी अ‍ॅम्ब्यलुन्स खरेदी करण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा वापर करून शासनाला किंवा ग्रामीण रुग्णालयांना अ‍ॅम्ब्यलुन्स हस्तांतर करण्याची विनंती केली होती. तसेच साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामध्ये अद्ययावत सॉफ्टवएर उपलब्ध व्हावी यासाठी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिकेमध्ये दिवाणी अर्ज करून उच्च न्यायालयात मागणी केली. परंतु संस्थानच्या तदर्थ समितीच्या सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याने सदर विषयावर एकमताने निर्णय न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीला बैठक घेऊन वरील व इतर विषयावर निर्णय घेण्याचे आदेश दिले.

खल केलेल्या जनहित याचिकेमध्ये याचिकाकर्ते यांच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, शासनाने 2 महिन्यात विश्वस्त मंडळ नेमण्याची हमी दिली होती. सदर 2 महिन्यांंचा कालावधी केव्हाच संपला असून शासनाने आजवर विश्वस्त मंडळ नेमलेले नाही.त्यावर उच्च न्यायालयाने शासनाला साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात माहिती घेण्यासाठी 2 आठवड्याची मुदत वाढ देत योग्य माहिती न दिल्यास अवमानाची कारवाई करू असे तोंडी आदेश दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com