काचा काढल्याने भक्तांना साई समाधीवर माथा टेकविता येणार

शिर्डी ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीला संस्थान प्रशासनाकडून हिरवा कंदील
काचा काढल्याने भक्तांना साई समाधीवर माथा टेकविता येणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईसमाधी मंदिरातील काचा व जाळ्या काढण्याचा निर्णय बुधवारी साईसंस्थानने घेतल्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले. साई भक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शिर्डीत येणार्‍या साई भक्तांना दर्शन घेण्याकरिता सुलभ व्हावे याकरिता साई समाधी मंदिरात असलेल्या काचा व जाळ्या काढण्यात यावा तसेच द्वारकामाई गुरुस्थान हे मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवावे द्वारकामाई मंदिरात चबुतर्‍यावर जाऊन दर्शन घेता यावे. शनि, महादेव. गणपती या मंदिरासमोरील असलेल्या जाळ्या काढाव्या अशा विविध मागण्या शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांच्याकडे केल्या होत्या. परंतु ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांना मंदिरातील काचा व जाळ्या काढण्याच्या सूचना केल्या होत्या. बुधवार 9 नोव्हेंबर पासून साईबाबा संस्थाने काचा व जाळ्या काढल्या आहेत. मात्र जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचा लढा सुरूच राहील अशी ग्रामस्थांची भूमिका कायम आहे.

साईबाबा संस्थाने समाधी मंदिरातील काचा व जाळ्या काढल्या असल्या तरी द्वारकामाई, गुरुस्थान हे दोन्ही मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवावे तसेच शनी, गणपती व महादेव मंदिर परिसरातील काढून हा परिसर भाविकांना दर्शन घेण्याकरिता खुला करावा अशा विविध मागण्या मान्य होण्याकरिता शनिवारी दि. 12 नोव्हेंबर रोजी शिर्डी ग्रामस्थांनी सर्वपक्षीय बैठक हॉटेल सिटी हार्ट याठिकाणी सकाळी 10 वाजता बोलवली असुन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत .

साई संस्थाने घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला असून भक्तांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आहे, अशी भावना कैलासबापू कोते यांनी व्यक्त केली. भाविकांना साई समाधीचे दर्शन घेण्याकरिता काचा व जाळ्या लावू नये अशी मागणी वर्षभरापासून शिर्डी ग्रामस्थांनी कार्यकारी अधिकार्‍यांच्याकडे केली होती. ना. विखे पाटील व खा.विखे पाटील यांच्या सूचनेवरून बुधवारी संस्थानने मंदिरातील काचा व जाळ्या काढल्या. ना. विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न केले त्यांचे व साईबाबा संस्थानचे ग्रामस्थांनी आभार मानले असल्याचे प्रमोद गोंदकर यांनी सांगितले.

भक्तांना दर्शन व्यवस्था खुले झाले हे सर्व श्रेय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व खासदार सुजय विखे पाटील तसेच ग्रामस्थ व साईभक्त या सर्वांना आहे. उशिरा का होईना आमच्या मागणीची दखल घेतली त्याबद्दल साई संस्थानचे आभार. या पुढील काळात भक्तांना सुख सुविधा व संरक्षण मिळण्याकरिता शिर्डी ग्रामस्थांचा लढा सुरूच राहील. असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com