शिर्डीत 15 हजार भक्तांना दर्शन घेता येणार

शिंगणापूर आणि मोहाटा देवी व अन्य मंदिरं भाविकांसाठी आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली
शिर्डीत 15 हजार भक्तांना दर्शन घेता येणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूर आणि मोहाटा देवी व अन्य मंदिरं भाविकांसाठी आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करण्यात यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

शिर्डीतील साई मंदिरात साई संस्थान प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात बदल करत दिवसभरात दर्शन दिले जाणार्‍या पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीनेच बुकिंग करून दर्शनाचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

साईबाबा संस्थानच्यावतीने दि.5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन 7 ऑक्टोबर रोजी साईमंदिर खुले करण्यासंबंधीची नियमावली मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी जाहीर केली होती. यावेळी श्रीमती बानाईत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की साई मंदिर राज्य शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात येणार असून दररोज पंधरा हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, यामध्ये पाच हजार सशुल्क पासेस, पाच हजार ऑनलाईन व पाच हजार बायोमेट्रिक पद्धतीने असे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोनच तासांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी मंदिर सुरू करण्याबाबत आढावा बैठक साई मंदिरातील साई सभागृहात आयोजित केली.

याप्रसंगी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ, प्रमोद म्हस्के, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री भोसले यांनी सांगितले की जिल्ह्यातील मंदिरे खुली करण्यापूर्वी सात तारखेच्या अगोदर त्या त्या संस्थांनी हमीपत्र देणे गरजेचे असून साई संस्थांकडून ते दिले गेले आहे. संस्थानच्या वतीने जाहीर केलेल्या नियमावलीत यापूर्वी दहा हजार ऑनलाईन पद्धतीने तर पाच हजार ऑफलाइन पद्धतीने दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता त्यामध्ये फेरबदल करून 15 हजार ऑनलाईन पद्धतीने दर्शनाची व्यवस्था असे करण्यात आले आहे. यास संस्थानने मान्यता दिली आहे. शिर्डी शहरातील दुकाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहतील, भाविकांनी दर्शनासाठी येताना पूजेचे साहित्य आणू नये, संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करावेत, जिल्ह्यात कोव्हिडचा प्रादुर्भाव लक्षात घेता संस्थानचे प्रसादालय बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार नाही.

आरटीपिसीआर चाचण्या करूनच भाविकांनी शिर्डीत यावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान दुपारी बारा वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बानाईत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर दोनच तासांनी जिल्हाधिकारी यांनी प्रेस घेऊन संस्थानच्या नियमावलीत फेरबदल केल्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना श्री भोसले यांनी सांगितले की जिल्हा प्रशासन आणि साई संस्थान यांच्यात समन्वय चांगला आहे, तीन दिवसांपूर्वीच साईसंस्थानने हमीपत्र दिले आहे. त्यामुळे समन्वयाची शंका मनात आणू नये असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकार्‍यांच्या नियमावलीने गावकर्‍यांना साई दर्शनाचा लाभ ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावे लागणार आहे.

त्याचबरोबर साई प्रसादालय बंद ठेवण्यात आल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. दर गुरुवारी निघणारी बाबांची पालखी देखील सध्या बंद ठेवण्यात आली आहे. मंदिर नियमित वेळेनुसार पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. लाडू प्रसाद, तीर्थप्रसाद बंद राहणार असून दर्शन रांगेत भाविकांना देण्यात येणारा चहा-बिस्किटे तूर्तास बंद करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

Related Stories

No stories found.