गुरुस्थान मंदिर आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरिता खुले

गुरुस्थान मंदिर आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरिता खुले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने सोमवार 14 नोव्हेंबर रोजीच्या माध्यान्ह आरतीपासून श्री साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांकरिता पूर्वीप्रमाणे गुरुस्थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरिता खुले करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्हणाल्या, श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले अनेक साईभक्त श्रींची आरती चालू असताना गुरुस्थान मंदिरास प्रदक्षिणा घालत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2020 साली संपूर्ण जगभरात व देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला. या संकटामुळे केंद्र व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये, अथवा करू नये, असे निर्देश देण्यात आलेले होते. त्याच पार्श्वभूमीवर 17 मार्च 2020 रोजी पासून साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2021 मध्ये करोनाचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे 7 ऑक्टोबर 2021 पासून साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. तसेच करोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद केलेल्या सोयी-सुविधा संस्थानच्यावतीने टप्प्या-टप्प्याने खुली करण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने काल सोमवारी माध्यान्ह आरतीपासून गुरुस्थान मंदिर पुर्वीप्रमाणे प्रदक्षिणा करण्यासाठी खुले करण्यात आले असल्याचे सांगून या सुविधेचा जास्तीस-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमती बानायत यांनी केले.

भाग्यश्री बानायत यांनी गुरुस्थान मंदिरास प्रथम परिक्रमा करून या सुविधेचा शुभारंभ केला. तसेच यावेळी त्यांचे समवेत सुमारे 100 ते 150 साईभक्तांनी श्रींची आरती संपेपर्यंत परिक्रमा केल्या. ही सुविधा सुरू झाल्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. याप्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, कर्मचारी व साईभक्त उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com