शिर्डी मंदिरात फुले विक्रीबाबत सर्वसंमतीने निर्णय - ना. विखे

मंदिर परिसरातच शेतकर्‍यांना देणार जागा
शिर्डी मंदिरात फुले विक्रीबाबत सर्वसंमतीने निर्णय - ना. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिर्डीतील फुले विक्रेत्यांचा विषय मागील महिन्यात ऐरणीवर आला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. शिर्डीतील मंदिर आवारातच फुले विक्रीसाठी शेतकर्‍यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. सर्वसंमतीने त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले आहे.

ना. विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिर्डी मंदिर परिसरात फुले विक्रीवरून मध्यंतरी आंदोलन झाले होते, यावर बोलताना ना.विखे म्हणाले, भाविकांची सोय व्हावी यासाठी मंदिर आवारात शेतकर्‍यांना फुले विक्रीसाठी जागा देण्याचे विचाराधीन आहे.

त्यामुळे भाविकांनाही रास्त दरात फुले खरेदीचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे मंदिराबाहेरून आत फुले आणण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. फुलांचे अवास्तव दर, त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी हे सर्व थांबेल. मात्र पुढील निर्णय सर्वसंमतीने घेतले जातील, असे त्यांनी सांगीतले.

मुख्यमंत्री शिंदे हे 2014 मध्ये काँग्रेससमवेत शिवसेनेची सत्ता स्थापण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन आले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोेक चव्हाण यांनी केला आहे व माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनीही या दाव्याला दुजोरा दिला होता. या पार्श्वभूमीवर, त्यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेल्या ना. विखेंना या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यावेळी माझ्यापर्यंत अशी कोणतीही चर्चा आली नाही व अशोक चव्हाण जे सांगतात, त्यात तथ्य नाही, असे स्पष्ट करून यावर ना. विखेंनी अधिक भाष्य टाळले.

नदीपात्रातील वाळूच्या बेकायदेशीर उपशाने पर्यावरणासह अन्यही अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने या वाळू उपशावर बंधने गरजेची आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील कर्नाटक व अन्य राज्यांतून याबाबत काय उपाययोजना केल्या गेल्या आहेत, याची माहिती घेऊन नाशिक विभागीय आयुक्तांना येत्या 10 दिवसात नव्या वाळू धोरणाचा आराखडा करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार राज्याचे नवे धोरण करण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही ना.विखेंनी स्पष्ट केले.

सिव्हीलचा अहवाल देणार

मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाला आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग कशी लागली, याबाबतचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ना. विखे यांना विचारले असता, राज्यात नवे सरकार आल्यानंतर आज पहिल्यांदाच हा विषय समोर आला आहे. सिव्हीलमधील आगीची ती घटना गंभीर आहे, त्यामुळे ती आग कशामुळे लागली, याची कारणे समजलीच पाहिजे. कोणाला विनाकारण दोषीही धरता कामा नये. त्यामुळे नाशिक विभागीय आयुक्तांनी या आगीच्या त्यावेळी केलेल्या चौकशीचा अहवाल मागवून घेतो व आठच दिवसात या अहवालाची माहिती माध्यमांना दिली जाईल, असेही विखेंनी आवर्जून स्पष्ट केले.

शिंदे सेनाच खरी शिवसेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. ते निश्चित शिवसैनिकांना योग्य दिशा देतील. मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यातील शिवाजी पार्कला होणारा मेळावा हा विचारधारा आणि शिवसैनिक शिल्लक नसलेल्यांचा होणार आहे, अशी टीका ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com