शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी विणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोथी आणि रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व सामान्य प्रशासन प्र.अधीक्षक नवनाथ कोते यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला.
यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास सुरुवात झाली. यावेळी प्रथम व व्दितीय अध्यायाचे वाचन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले. साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व त्यांची पत्नी दीपाली भोसले यांच्याहस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व सर्व धर्म समभाव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आधारित साई दरबार हा भव्य देखावा समाधी मंदिर व फूल सजावट. साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्त ए.महेश रेड्डी यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
बुधवार हा श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे श्रींची काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान, सकाळी श्रींची पाद्यपूजा, भिक्षा झोळी कार्यक्रम, अंजली श्रीकृष्ण जोशी यांचा किर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी 10.30 वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी माध्यान्ह आरती तर सायंकाळी खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी धुपारती होईल. रात्री निरजा पालवी, भोपाल यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार असून गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक होणार आहे. श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे दि. 05 ऑक्टोबर रोजी होणारी शेजारती व दि. 06 ऑक्टोबर रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.