
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
श्री साईबाबा संस्थानच्या दानपेटीत सात महिन्यात सुमारे 188 कोटी 55 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
सात महिन्यातील दानाचा हा आकडा नवा विक्रम ठरला आहे. कोविडमुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र ठरलेले शिर्डी येथील श्री साईमंदीर बंद होते. मागील वर्षी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी साईमंदिर खुले झाले. त्यानंतर देशविदेशातील भाविकांनी साईदर्शनासाठी रिघ लावली. मागील पाच महिन्यात 41 लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. कोविड काळात शिर्डी शहराची आर्थिक स्थिती ढासळली होती.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये 17 मार्च 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत मंदिर बंद होते. कोविडच्या दुसर्या लाटेत 5 एप्रिल 2021 रोजी साईमंदिर पुन्हा बंद झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 7 अक्टोबर 2021 रोजी भाविकांसाठी खुले केले. निर्बंध शिथिल झाल्यानंतर साईभक्तांनी सढळहस्ते दानपेटीत दान केले.