साईबाबा, शनी दर्शन आजपासून बंद

साईबाबा, शनी दर्शन आजपासून बंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

देशातील व राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने ०४ एप्रिल २०२१ च्‍या

कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून दि. ०५ एप्रिल २०२१ रोजी रात्रौ ८ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्‍यात येणार आहे. तसेच याकाळात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु राहतील अशी माहिती संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

श्री.ठाकरे म्‍हणाले, श्रीक्षेत्र शिर्डी हे देशातील नंबर दोनचे देवस्‍थान असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या कानाकोप-यातुन भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात.

त्‍यामुळे मंदिर व मंदिर परिसरात मोठी वर्दळ होत असते. गेल्‍या वर्षी जगभरात व देशात आलेल्‍या करोना विषाणूच्‍या संकटामुळे दि. १७ मार्च २०२० रोजी श्रीं चे समाधी मंदिर बंद करण्‍यात आले होते. त्‍यानंतर दि. १४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये दि. १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आले होते.

परंतु सध्या पुन्हा राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्‍यात आलेले आहे.

सोनई |वार्ताहर| Sonai

करोना संसर्गाची वाढलेली स्थिती लक्षात घेऊन शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ आदेश म्हणून शनिशिंगणापूर येथील शनिमंदीर सोमवारपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

राज्याबरोबरच जिल्हा आणि तालुक्यात रोजच करोना रुग्ण वाढत आहेत. हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने निर्णय घेऊन पहाटे साडेचार वाजता आरती सोहळा झाल्यानंतर महाद्वार परीसरात सरंक्षण कठडे टाकून मंदीरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून 13 एप्रिल रोजी असलेली गुढीपाडवा यात्रा, व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे गावातील सर्व पुजा साहित्य दुकाने व हॉटेल उघडले होते. मंदीर बंद करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानेही बंद केले. बाहेरून आलेल्या भाविकांनी महाद्वारात लावलेल्या स्क्रीनवर शनिदेवाचे दर्शन घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com