
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरावरील भोंगे गेल्या दीडशे वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. साईबाबांच्या समाधीला 105 वर्षे पूर्ण झाली असून त्यापूर्वीपासूनच हे भोंगे सुरू आहेत. श्री साईबाबांच्या मंदिरावरील ध्वनिक्षेपण शिर्डी पोलीस प्रशासनाने बंद केले आहे. या सर्व गोष्टींचा शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त म्हणून निषेध व्यक्त करत पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने खास बाब म्हणून साई मंदिरावरील भोंगे सुरू करावेत अन्यथा करोडो साईभक्तांमध्ये उद्रेक होईल, अशी खंत कमलाकर कोते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कमलाकर कोते यांनी जगप्रसिद्ध श्री साईमंदिरावरील भोंग्याबाबत मत व्यक्त करताना म्हटले आहे की, श्री साईबाबांच्या मंदिरावरील भोंगे गेल्या दीडशे वर्षांपासून आजतागायत सुरू आहेत. या भोंग्यावरून पहाटेची बाबांची भूपाळी लावली जाते. यामधून मंगल स्वर निर्माण होतात. साईभक्त देश-विदेशातून खास काकड आरती व भूपाळीसाठी शिर्डी दरबारी हजेरी लावतात. लाखो साईभक्तांची इच्छा असते की याठिकाणी आल्यानंतर बाबांची काकड आरती केली पाहिजे. या काकड आरतीसाठी लाखो भाविक उत्सुक असतात. मात्र मंदिरावरील ध्वनिक्षेपण बंद केल्यामुळे करोडो साईभक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. या भावनांचा विचार करता पोलीस प्रशासनाने तसेच महाराष्ट्र सरकारने विचार करून खास बाब म्हणून शिर्डीचा साईबाबा मंदिरावरील भोंगे सुरू केले पाहिजे.
त्याचबरोबर शिर्डी शहरातील जामा मस्जिदचे मौलाना, अध्यक्ष, विश्वस्त यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी अतिशय मौलिक भूमिका घेऊन शहरातील मस्जिदीवरील पहाटेची अजान भोंग्यावरुन बंद केली आहे. परंतु बाबांची काकड आरती आणि शेजारती सुरू ठेवावी, अशी मागणी करून देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल शिर्डी ग्रामस्थ म्हणून त्यांचे आभार मानतो. तसेच राज्य शासनाने मंदिरावरील भोंगे बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचा पुनर्विचार करावा अन्यथा साई भक्तांमध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही कमलाकर कोते यांनी म्हटले आहे.