शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन साईसंस्थान प्रशासनाने दिले आहे.

यामुळे संस्थान रुग्णालयातील स्पेशालिटी डॉक्टरांनी प्रोत्साहन भत्यासाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन मंगळवारी आठवडाभराकरिता स्थगित केले.

साईसंस्थानकडून याबाबत योग्य तो निर्णय होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र निराशा पदरी पडली तर दि. 29 मार्चपासून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असे डॉक्टरांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांना मेस्मा लावण्याचा तर डॉक्टरांनीही सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले होते.

मात्र दोन्ही बाजूंनी साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या तत्वानुसार निर्णय घेण्याचे ठरल्याने मंगळवारी तणाव निवळला. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ओपीडी पेशंट तपासल्यानंतर मंगळवारी पुन्हा बैठे आंदोलन सुरू करणार होते. दरम्यान, संस्थानचे सीईओ बगाटे बाहेरगावी असल्याने त्यांच्या वतीने डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी संवाद साधला.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे उपस्थित होते. डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी प्रशासनावर विश्वास ठेवून सबुरी धरावी, असे ठाकरे यांनी डॉक्टरांना सांगितले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टरांनीही आंदोलन आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

साईसंस्थानने सोमवारी कारवाई संदर्भात डॉक्टरांना बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अशी विनंतीही डॉक्टरांनी यावेळी केली. मात्र श्री. बगाटे बाहेरगावी असल्याने आपण त्याबाबत काही निर्णय घेऊ शकत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.