साईबाबांबद्दल अपशब्द, साई संस्थानकडून भिडेंवर गुन्हा

शिर्डी ग्रामस्थांकडून वक्तव्याचा निषेध
साईबाबांबद्दल अपशब्द, साई संस्थानकडून भिडेंवर गुन्हा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटनेचा संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याने साईबाबा व महापुरूषांच्या विषयी केलेल्या बेछुट, अवमानकारक व संतापजनक वक्तव्याचे तीव्र पडसाद साईनगरीसह जगभरातील साईभक्तांमध्ये उमटले आहेत. साईबाबा संस्थानने याप्रकरणी संभाजी भिडे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्वपक्षीय ग्रामस्थांनीही भिडे याच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन शिर्डी पोलिसांना दिले आहे. दोन दिवसांपूर्वी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेत साईबाबांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.

या संदर्भात शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची काल सकाळी बैठक झाली. भिडे हा मनोरूग्ण आहे, त्यावर काही बोलाव इतकी त्याची लायकी नाही, त्याच्यावर कठोर कारवाईबरोबरच उपचाराचीही गरज आहे. अशा शेलक्या शब्दात ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रीया सामुहिकपणे व्यक्त केली. ग्रामस्थांनी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांना भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, निलेश कोते, सचिन शिंदे, नितीन उत्तमराव कोते, रवींद्र गोंदकर, दीपक वारूळे, संदीप सोनवणे, विजय जगताप, दत्तात्रय कोते, देवराम सजन, सर्जेराव कोते, नितीन अशोक कोते, विकास गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन वाणी, अमोल कोते, विशाल कोते, अविनाश गोंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ राहुल जाधव यांची भेट घेऊन संस्थानने या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. यानंतर जाधव यांनी वरिष्ठांशी व व्यवस्थापनाशी चर्चा करून भिडे विरूद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संस्थानचे सरंक्षण प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भिडे याच्या विरोधात भादंवि.कलम 295 (अ), 153 (अ), 298, 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे पुढील तपास करत आहेत.

सांगलीतील साईमंदिरात काही वर्षापूर्वी भिडे साईबाबांची आरती करतानाचा फोटोही समाज माध्यमांत फिरत आहे. एकीकडे भिडे साईबाबांच्या आरत्या करतो व दुसरीकडे साईबाबांच्या मूर्ती घराबाहेर काढण्याचे आवाहन करतो या दुटप्पीपणाकडे शिर्डीकरांनी लक्ष वेधले आहे. माथेफीरू असलेला भिडे प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com