साईबाबांची गुरुवारची पालखी पूर्ववत सुरू करावी - कोते

साईबाबांची गुरुवारची पालखी पूर्ववत सुरू करावी - कोते

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतगायत सुरू असलेल्या गुरुवारची साईबाबांची पालखी लॉकडाऊन काळात बंद करण्यात आली असून राज्यातील इतर देवस्थानप्रमाणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिर्डी येथील श्री साईबाबांचे समकालीन साईभक्त कै. तात्या पाटील कोते तसेच बायजामाई कोते यांचे वंशज सर्जेराव कोते तसेच साईभक्तांकडून करण्यात येत आहे.

सर्जेराव कोते यांनी म्हटले आहे की, साईबाबांच्या हयातीपासून दर गुरुवारी द्वारकामाईतून पालखी काढण्यात येत आहे. मात्र कोविड काळात लॉकडाऊनमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये या कारणास्तव साई संस्थान प्रशासनाच्यावतीने साई पालखी सोहळा बंद करण्यात आला आहे.

राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर शेगाव आदी देवस्थानांवर पालखी सोहळा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार साईबाबांच्या हयातीत सुरू झालेल्या दर गुरुवारच्या द्वारकामाई चावडी साईमंदिर हा साईपालखी सोहळा साईबाबा संस्थानने कमीत कमी पुजारी तसेच पालखीसाठी लागणारे कर्मचारी आणि पालखीचे मानकरी यांंच्यासह सुरू करण्यात यावा, अशी मागणी साईभक्तांसह पालखीचे मानकरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संस्थान प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे श्री. कोते यांनी म्हटले आहे. साई संस्थानचा पालखी सोहळा सातासमुद्रापार पोहचला असून या सोहळ्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्थान प्रशासनाने कोविड नियमांचे काटेकोर पालन करत दर्शन व्यवस्था चोख ठेवली आहे. कोविडचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शेगाव आणि तुळजापूरच्या धर्तीवर गुरुवारचा साईबाबा पालखी सोहळा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com