आजपासून साईबाबांच्या मुख दर्शनाची व्यवस्था सुरू

आजपासून साईबाबांच्या मुख दर्शनाची व्यवस्था सुरू
desibantu

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने श्रींचे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता आज दिनांक 16 डिसेंबर पासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत आरतीच्या वेळे व्यतिरिक्त मुख दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्हणाल्या, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दि. 5 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु राज्य शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार 7 ऑक्टोबर रोजी सुमारे 15 हजार भाविकांना ऑनलाईन पासेसद्वारे श्रींची दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यानंतर दि. 17 नोव्हेंबर 2021 पासून ऑफलाईन पासेसद्वारे 10 हजार भाविकांची अशी एकूण 25 हजार भाविकांची दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आलेली असून प्रति तास 1150 भाविकांना श्रींच्या दर्शनाकरिता सशुल्क व नि:शुल्क ऑफलाईन पासेस देण्यात येतात. त्यामुळे गर्दीच्या काळात अनेक भाविकांना दर्शन पास मिळत नसल्याने साईभक्तांकडून वारंवार मुखदर्शन सुरू करण्याची मागणी होत होती.

तसेच दिनांक 24 डिसेंबर ते 3 जानेवारी 2022 अखेर नाताळ व नववर्षारंभ असल्याने भाविकांची होणारी संभाव्य गर्दी व साईभक्तांची मागणी लक्षात घेऊन दि. 16 डिसेंबर 2021 रोजीपासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत (आरतीच्या वेळे व्यतिरिक्त) मुखदर्शन गेट चालू राहील. तरी सर्व साईभक्तांनी कोविड 19 चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून श्रींच्या मुखदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com