साईबाबा कोविड सेंटरमध्ये कर्मचार्‍यांची पूर्तता करावी

साईबाबा कोविड सेंटरमध्ये कर्मचार्‍यांची पूर्तता करावी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दिपक गोंदकर यांची मागणी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जिल्ह्यातील नावाजलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस, पुरेसा औषधसाठा तसेच आरोग्य कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून याठिकाणी वरीलप्रमाणे सर्व जागांची तात्काळ पुर्तता करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांनी निवेदनपत्राद्वारे केली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ शनिवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आले असता त्यांचे शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ. आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, दिपक गोंदकर, गंगाधर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिपक गोंदकर यांनी ना. मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा संस्थानने साईआश्रम धर्मशाळा 2 येथे अद्ययावत असे सुसज्ज कोविड रुग्णालय चालू केले असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत.

अद्यापपर्यंत हजारो रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहे. साईबाबा संस्थानने कोविड सेंटर व साईबाबा सुपर हॉस्पिटल या दोन्हीही ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार केले जात असून सुमारे 600 रुग्ण सध्या उपचार घेत आहे. परंतु डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी स्टाफची कमतरता असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. ऑक्सिजनची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. चार-पाच दिवसापूर्वी साईबाबा कोविड सेंटरला ऑक्सिजन संपल्यामुळे तेथील रुग्ण साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये तत्काळ शिफ्ट करण्यात आल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

सध्या राहाता तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील रुग्णांचा ओघ याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संस्थानने डॉक्टर नर्स व आरोग्य कर्मचारी यांची नव्याने नेमणूक केली आहे, परंतु तीही संख्या अपुरी पडत आहे. साईबाबा संस्थानचे ऑक्सिजन प्लांटचे काम प्रगतीपथावर आहे. सदर प्लांट चालू होईपर्यंत शासनाकडून पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यास यावा. तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनामार्फत डॉक्टर्स नर्स व आरोग्य कर्मचारी त्याचप्रमाणे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनावर सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे, महेंद्र शेळके, निलेश कोते, अमित शेळके, राकेश कोते, चंद्रकांत गोंदकर, विशाल भडांगे, सुनील गोंदकर, प्रकाश गोंदकर, राहुल कुलकर्णी, गणेश गोंदकर, अभिराज कोते, लखन वाघचौरे, अमोल सुपेकर, साई कोतकर, शायद सय्येद, राहुल फुंदे, फर्याद शेख आदीच्या सह्यानिशी देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com